?धक्कादायक : कोरोनाबाधित महिलेवर कोविड सेंटर बाहेर फूटपाथवर झोपण्याची वेळ
पुणे महाराष्ट्रात सध्या कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. पुण्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असतानाच कोरोनाबाधित रुग्णांना उपचार घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं दिसून येत आहे.
पुण्यातील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या महिलेला जम्बो कोव्हिड सेंटर बाहेर चक्क फुटपाथवर झोपण्याची वेळ आली. पुण्यात राहणाऱ्या एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तिने पुणे महापालिकेच्या जम्बो कोव्हिड रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. परंतु व्हीलचेअर नसल्यामुळे त्या महिलेला बाहेर थांबवण्यात आलं.
रुग्णालयाच्या बाहेर वाट बघत थांबली असताना वेदना सहन न झाल्यामुळे त्या महिलेवर जम्बो कोव्हिड सेंटर बाहेरील फूटपाथवर झोपण्याची वेळ आली. पुण्यात दिवसेंदिवस झपाट्याने रुग्ण संख्या वाढत असताना रुग्णांना दररोज उपचार घेण्यासाठी रुग्णालयाबाहेर रांगेत उभं राहावं लागत आहे.
काही वेळानंतर त्या महिलेला व्हील चेअर उपलब्ध करून देऊन जम्बो कोव्हिड सेंटरच्या प्रशासनाने उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेऊन भरती केलं. महापालिकेने जारी केलेल्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क केल्यानंतरच कोरोना बाधित रुग्णांनी रुग्णालयात येणं अपेक्षित आहे, पण तसं न होता थेट ते रुग्णालयात येत असल्याने प्रशासनाचा मोठा गोंधळ उडत असल्याचं जम्बो हॉस्पिटलचे डीन डॉ. कपाले यांनी सांगितलं आहे.






