लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणं ही सर्वांची जबाबदारी : अजित पवार
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे :करोना प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल,” असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. “पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा. लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे.
“राज्यात २१ दिवसांचा लॉकडाऊन, संचारबंदी असली तरी, दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे,” अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या. “बारामती, वाई शहरात अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजानं, स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावं,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.






