पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर कारवाई होणार का ?
दत्ता पारेकर पुणे
पुणे : इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी ठाण्यामध्ये आलेल्या वेगवेगळ्या फिर्यादी आणि तक्रारदार यांना योग्य तो न्याय दिला नाही म्हणून बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव अँड.राहुल मखरे यांनी त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती.या कारवाईच्या मागणीसंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज (दि.९)रोजी इंदापूर शहर बंद पुकारण्यात आले होते.बहुजन मुक्ती पार्टी च्या कार्यकर्त्यांनी इंदापूर शहरातील व्यापारी वर्गाला बंद पाळण्याचे आवाहन केले होते.या बंदला व्यापारी वर्गाने प्रतिसाद देत शंभर टक्के कडकडीत बंद पाळला.
दरम्यान इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अँड.राहुल मखरे यांनी इंदापूर पोलीस स्टेशन समोर दि.१९ डिसेंबर रोजी अमरण उपोषण सुरू केले होते. ते आंदोलन चिघळणार त्याचवेळी दि.२० डिसेंबर रोजी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपोषण स्थळास भेट देत अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांना फोन केला.यावेळेस मोहिते यांनी भीमा कोरेगाव च्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याने दि.६ जानेवारी पर्यंत आम्ही इंदापूर चे पोलीस निरीक्षक सारंगकर यांच्यावर कारवाई करतो असे आश्वासन दिले होते व सदरील उपोषण मागे घेण्यात आले होते.
मात्र दि.६ जानेवारी पर्यंत पोलीस निरीक्षक सारंगकर यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज दि.९ जानेवारी रोजी इंदापूर शहरात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बंद चे आव्हान करण्यात आले होते. त्यामुळे इंदापूर शहरातील मुख्य बाजार पेठे सह सर्वच व्यापारी वर्गाबरोबर नागरिकांनी कडकडीत बंद पाळला.या बंद च्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या.
सारंगकर यांच्यावर कारवाई न झाल्यास रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे अँड.मखरे यांनी सांगितले






