काँग्रेस रॅली प्रकरणी 25 जणांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गणेश ढेंबरे / औरंगाबाद
महागाईच्या विरोधात शहर युवक काँग्रेसतर्फे शहरातील गांधीपुतळा ते भडकल गेट असे सायकल रॅलीचे नियोजन केले होते. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी दुपारी सायकल यात्रा काढली देखील. परंतु कोरोना निर्बंधांमुळे यात्रेला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्या अनुषंगाने सिटीचौक पोलीस ठाण्यात पदाधिकारी- कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे आरोपी म्हणून त्यांनी २५ सायकलींचा उल्लेख केला.
वाढते पेट्रोल-डिझेलचे दर, महागाईचा वाढता आकडा याला अनुसरून शहर युवक काँग्रेस शुक्रवारी कार्त्याकार्त्यांच्या उपस्थितीत सायकल यात्रा काढली. शाहगंज गांधी पुतळा ते भडकल गेट असा यात्रेचा मार्ग होता. हा मार्ग सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे सपोनि सय्यद मोहसीन अली अझहर अली यांनी शहर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात फिर्याद देत कोरोना निर्बंध मोडल्यामुळे गुन्हा दाखल केला.
दरम्यान, दैनंदिन गुन्हे आढावामध्ये आरोपीच्या रकान्यात सिटीचौक पोलिसांकडून २५ सायकलीवर दाखल करण्यात आल्याचे दर्शविण्यात आले. त्यामुळे आता कार्यकर्त्यांबरोबरच सायकलीवर देखील गुन्हे दाखल होत असल्याची चर्चा शहरात सुरु होती. तर अल्ताफ लतीफ पटेल, विलास बापू औताडे, निलेश पवार, अरुण शिरसाठ यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्त्यांवर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






