अखेर डॉ. राहुलची कोरोनाशी झुंज अपयशी..
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : ऊसतोड मजुराच्या डॉक्टर मुलाची कोरोनाशी जवळपास महिनाभरापासूनची झुंज आज अपयशी ठरली. कोविडयोद्धा डॉ. राहुल पवारला रुग्णांवर उपचार करतांना कोरोनाची बाधा झाली.
त्यानंतर त्याच्यावर १ मे पासून औरंगाबाद येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. येथेच आज दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यातील आनंदनगर तांडा (ता. पाथरी) येथील ऊसतोड मजुराच्या कुटुंबात राहुल पवारचा जन्म झाला. लातूर येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर तो तेथेच इंटर्न म्हणून कोविड वॉर्डात रुग्णसेवा देत होता.
याचदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्याची प्रकृती अधिक गुंतागुंतीची झाली. त्याच्या मित्रांनी त्याला १ मेला औरंगाबादेतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याला अनेकांनी मदत केली. पण हे नियतीला ते मान्य नव्हते. बुधवारी दुपारी डॉ. राहुल पवार याने या जगातून कायमचा निरोप घेतला. ही माहिती कळताच कुटुंबिय, मित्रपरिवाराला एकच धक्का बसला.






