Pune

जातपडताळणीचे प्रलंबित दावे तात्काळ निकाली काढा – डी.बी.घोडे

जातपडताळणीचे प्रलंबित दावे तात्काळ निकाली काढा – डी.बी.घोडे

पुणे – प्रतिनीधी दिलीप आंबवणे

अनेक वर्षांपासून राज्यातील आठही अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्याकडे हजारोंच्या संख्येत जातपडताळणीचे दावे प्रलंबित आहेत.अशी प्रलंबित प्रकरणे विहीत कालावधीत, विशेष मोहीमे अंतर्गत तात्काळ निकाली काढावी. अशी मागणी आदिवासी विकास मंत्री अँड.के.सी.पाडवी यांचेकडे बिरसा क्रांती दलाचे सचिव डी.बी.घोडे व पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने २१ डिसेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.
या शासन निर्णयानुसार ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अनुसूचित जमातीचे जातप्रमाणपत्र अवैध ठरले आहे, ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांनी अद्यापही जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही अशांना अधिसंख्य पदावर वर्ग करुन अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त करुन भरण्याचे आदेश आहेत.

अनेक वर्षापासून ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अनुसूचित जमातींच्या राखीव जागेवर नौकरी मिळवली आहे. परंतू जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही.अर्थात त्यांनी जाणीवपूर्वक जातपडताळणी समितीला सहकार्य न केल्यामुळे नियुक्ती अधिकाऱ्यांकडे ते जातवैधता प्रमाणपत्र सादर करु शकले नाही.

अशांचे राज्यातील आठही जातपडताळणी तपासणी समित्याकडे हजारोंच्या संख्येत दावे प्रलंबित आहेत.तपासणी समित्यांकडे दावे प्रलंबित असलेले अधिकारी, कर्मचारी अधिसंख्य झाल्यास न्यायालयात जातात व स्थगिती आणतात. अशी बरीचशी प्रकरणे निदर्शनास आलेली आहेत. त्यामुळे मुळ आदिवासी समाजाच्या राखीव जागा रिक्त होत नाहीत.

परिणामत: प्रलंबित दावे निकाली न निघाल्यामुळे मुळ आदिवासींचा राखीव जागेवर घटनात्मक हक्क असतांनाही सुद्धा जागा रिक्त होऊन भरल्या जात नाहीत.
शासन निर्णयानुसार पदभरतीत आदिवासी समाजाच्या बेरोजगार युवकांना आपला घटनात्मक हक्क मिळण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हजारो दावे निकाली काढणे अगत्याचे आहे.

असे प्रलंबित असलेले हजारो दावे विहित कालावधीत विशेष मोहिमे अंतर्गत निकाली काढण्यात यावेत . आणि ज्यांचे दावे अवैध ठरतील अशांवर आणि खोटे जमाती प्रमाणपत्र देणा-यांवर जातपडताळणी कायद्यान्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button