Chopda

उद्योजकांच्या विविध समस्यांचे होणार निराकरण; जळगावात स्थापन होणार एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील याचा पाठपुरावा

उद्योजकांच्या विविध समस्यांचे होणार निराकरण; जळगावात स्थापन होणार एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील याचा पाठपुरावा

हेमकांत गायकवाड चोपडा

Chopda : जळगावात महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळ अर्थात एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला असून आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह उद्योजकांच्या शिष्टमंडळाची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, यासोबत जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्राला उभारी देणारे महत्वाचे विषय देखील या बैठकीत मार्गी लागले आहेत.

याबाबत माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे उद्योजकांची बैठक घेऊन यात त्यांना भेडसावणार्‍या समस्या जाणून घेत, याचे तातडीने निराकरण करण्याची ग्वाही दिली होती. या अनुषंगाने आज मंत्रालयात राज्याचे उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्यासोबत ना. गुलाबराव पाटील यांनी बैठक घेतली. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह उद्योजकांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

या बैठकीत एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय धुळे येथे असल्यामुळे जळगावच्या उद्योजकांना खूप अडचणी येतात. परिणामी जळगाव येथे हे कार्यालय सुरू करावे अशी मागणी ना. गुलाबराव पाटील यांनी केली. यावर उद्योगमंत्र्यांनी संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत हा विषय घेऊन अतिरिक्त प्रादेशिक अधिकारीपद निर्मित करण्याचा व यात जळगावचा समावेश करण्याला मान्यता दिली. परिणामी हा महत्वाचा विषय आता मार्गी लागणार असून जळगाव जिल्हा औद्योगिकदृष्ट्या मागास असल्याने उद्योजकांना सवलती मिळत नाहीत. यामुळे जळगाव औद्योगिक वसाहतीचा दर्जा हा डी वरून डी प्लस करावा अशी मागणी ना. गुलाबराव पाटील यांनी केली. यावर उद्योगमंत्र्यांनी याबाबतच्या शासन आदेशात दुरूस्ती करून धुळे ऐवजी उत्तर महाराष्ट्र असा उल्लेख करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिलेत. यामुळे जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांना आता सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ट्रक टर्मिनर होणार

जळगावच्या अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये ट्रक टर्मिनससाठी भुखंड आरक्षित करण्यात आला असून येथे टर्मिनस उभारण्यात यावे अशी मागणी ना. गुलाबराव पाटील यांनी केली. यावर ट्रक टर्मिनसचा प्रस्ताव महामंडळाच्या धोरणानुसार दोन महिन्यात सादर करण्यात यावा असे निर्देश उद्योगमंत्र्यांनी दिले.

रोजगार निर्मितीसाठी होणार एमआयडीसी !
ना. गुलाबराव पाटील यांनी अलीकडेच धरणगाव तालुक्यात औद्योगिक वसाहत उभारण्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने आजच्या बैठकीत धरणगाव येथे मोठ्या प्रमाणात जिनींग व प्रेसींग उद्योग असल्याने येथे एमआयडीसीची उभारणी करण्यात यावे अशी मागणी केली. यावर तालुक्यातील मौजे जांभोरा येथील शासकीय जमीन ताब्यात घेऊन औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उद्योग मंत्र्यांनी दिली. याच्या सोबत आजच्या बैठकीत पाचोरा-भडगाव, मुक्ताईनगर, चोपडा येथे औद्योगिक क्षेत्राची उभारणी करावी. जळगाव येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारावे या मागण्यांनाही सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे. यावेळी आमदार किशोर पाटील, आ. चंद्रकांत पाटील, आ. अनिल पाटील, एम. आय.डी. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अंबलगन व उद्योग विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चौकट

आज बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी असल्याने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना बहिणाबाईंची अतिशय आकर्षक अशी प्रतिमा भेट दिली. याप्रसंगी आसोदा येथील किशोर चौधरी, उद्योजक किशोर ढाके , दहाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – पालकमंत्री

या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्ह्यात रोजगार निर्मीतीसाठी औद्योगीक विकास होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने उद्योजकांच्या सर्व समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याला आपले प्राधान्य राहणार आहे. आपण सातत्याने उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही ना. पाटील यांनी या भेटी प्रसंगी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button