?️ कोरोना भूमी अमळनेर…
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस शहरात वाढतच चालली आहे परिणामी अमळनेर नगरी आता कोरोना नगरी किंवा कोरोना भूमी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
अमळनेर तालुका अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. अमळनेर म्हणजे अमल+निर शुद्ध पाणी असलेले ठिकाण म्हणजे अमळनेर…ह्या भूमीला खूप मोठा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक,औद्योगिक वारसा लाभलेला आहे.या अमळनेर च्या भूमीत जसे अनेक थोर संत होऊन गेले तसेच उद्योजक ह्याच मातीत घडले.हीच भूमी साने गुरुजींची कर्मभूमी ठरली तर याच भूमीत स्वातंत्र्यंपूर्व काळात अनेक लोकांनी आपले बलिदान ही दिले…या भूमीत अनेक कलावंत,लेखक,साहित्यिक जन्मले आणि आपला वारसा ह्या भूमीतील पिढीला सोपवून गेले.
ह्याच अमळनेरच्या भूमीने अनेक चढ उतार स्वातंत्र्य काळात आणि त्यानंतरच्या कलखंडातही अनुभवले…येथे रामाला,संत सखाराम महाराजनां मानणारे,अल्लाची ईबादत करणारे,गुरुद्वारा मानणारे,कृष्ण पूजा करणारे अनेक जाती धर्माचे लोक मोठ्या गुण्या गोविंदाने नांदले आणि नांदत राहतील…
अमळनेर च्या उद्योग क्षेत्रात मनाचा तुरा रोवणारी प्रताप मिलची उन्नती प्रगती आणि अधोगती ह्याच भूमीने अनुभवली.खान्देश शिक्षण मंडळाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहचून पुन्हा डब घाईला गेलेली खा शि खादाड शि मंडळ झाल्यामुळे बदनाम झालेली ह्याच भूमीने अनुभवली आणि अनुभवत आहे…
एकेकाळी राजकारणात राष्ट्रीय पातळीवर अमळनेर चे नाव गाजलेले देखील ह्याच भूमीने अनुभवले तर राजकारणात विकाऊ अमळनेर चा शिक्का देखील ह्याच भूमी वर लागला…पैसे घेऊन विकला जाणारा तालुका म्हणून तालुक्याची ओळख निर्माण झाली…
काय नाही पाहिले ह्या अमळनेर च्या भूमीने.. यश,कीर्ती,मान सर्व काही… अपमान ही बदनामीची ह्याच भूमीने रिचवली…
भ्रष्टाचाराचा बालेकिल्ला म्हणून अमळनेर तालुक्याची ओळख आहे. येथे सर्व बेकायदेशीर धंदे सर्रास पणे चालतात.दोन नं च्या धंद्यांना उत आलाय तर इथे दोन नं पैसा महामुर वाहतो..
उद्योग नसतानाही येथील जमिनींचा भाव मुंबई पुण्या लाही मागे टाकणारा आहे..येथे दुष्काळ जाहीर होतो पण कोणीही गरीब नाही आहे..
आता सर्व गोष्टी अनुभवून झाल्या होत्या फक्त कोरोनाची टेस्ट घ्यायची बाकी होती.ही भूमी इथे ही कमी पडली नाही. जे काही करायचं ते अटकेपार च करायचं त्यामुळे अमळनेर भूमी कोरोनाची झपाट्याने वाढणारी पॉझिटिव्ह संख्या ही पाहत आहे. अमळनेर ची भूमी शांत आहे आणि आपल्याच अपत्यांचे प्रताप पाहते आहे…सर्व संकटातून नेहमीच ही भूमी अलगद पणे बाहेर निघाली आहे.याही संकटातून आपण बाहेर येऊ यात काही शंका नाही पण आपण सर्वांनी या ऐतिहासिक भूमीला दागदार होण्या पासून वाचविले पाहिजे.चंद्रा वर जरी डाग चांगला दिसत असला तरी अमळनेर च्या पावनऐतिहासिक भूमीवर कोणताही डाग लागू देणार नाही याची काळजी आपणा सर्वांना घ्यावी लागेल…
या भूमीने आम्हाला सर्वांना खूप काही दिलं आहे आता वेळ आहे आपली आपणे ह्या अमळनेर च्या भूमीचं काहीतरी देणं लागतो कमीत कमी या भावनेने तरी एकजूट होऊन पण दुरून दुरून कोरोना च्या ह्या संकटावर मात करू या…
- नियम पाळू
- मास्क लावू
- शारीरिक अंतर ठेवू
- नियमित हात पाय धुवून च काम करू
- इकडे तिकडे थुंकणार नाही
- थोडंही आजाराचं लक्षण दिसताच दवाखान्यात जाऊ
- घरातच राहू
- विनाकारण बाहेर पडणार नाही
- आवश्यक तेवढं समान असे पर्यंत तेव्हढं वापरू
- आपली आपल्या शेजारच्यांची काळजी घेऊ
- प्रशासनाला मदत करू






