? Crime Diary..गांजाची तस्करी करणारे दोन महिलांसह चार जण अटकेत, पाच लाखाचा गांजा जप्त
औरंगाबाद :- गणेश ढेंबरे
औरंगाबाद : शहरात गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना पोलिसांनी आज मध्यरात्री शिताफीने अटक केली. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. आरोपींकडून पाच लाख 31 हजार रुपयांचा 106 किलो गांजा व एक इनोव्हा कार असा एकूण 15 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशाल छगन तामचीकार (वय 48 रा. नारेगाव, औरंगाबाद), शेरसिंग अमू इंदरेकर (वय 36 रा. नारेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोन महिलांनाही अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड व उपनिरीक्षक विठ्ठल चासकर यांना गुप्त माहिती मिळाली की, एक राखाड्या रंगाची कार (MH 03 BC 2713) गांजा घेऊन मयुरपार्क चौकाकडून हर्सूल कडे जात आहे. पोलिसांनी सदर ठिकाणी स्टाफच्या मदतीने गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता गाडी सुसाट वेगाने पुढे निघून गेली. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर गाडी थोड्या अंतरावर जाऊन थांबली. गाडीमधून दोन व्यक्ती उतरून पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. तसेच गाडीमधील दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. गाडीची चेकिंग केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये 106 किलो वजनाच्या चार प्लास्टिकच्या गोण्यात 49 बॅगा आढळून आल्या. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, पोलिसांनी दोन महिलासह चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून एक इनोव्हा कारसह 15 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चासकर, अमोल देशमुख, शेख नजीर, पोलीस हवालदार सतीश जाधव, सुधाकर मिसाळ, ओमप्रकाश बनकर, संजयसिंह राजपूत, शिवा बोर्डे, रवींद्र खरात, अमर चौधरी, धर्मराज गायकवाड, राजकुमार सूर्यवंशी, नितीन देशमुख, नितीन धुळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी केली आहे.






