Chalisgaon

आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयातील जनसेवकांनी फुलवला कोविड सेंटर मध्ये भावभक्तीचा मळा…

आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयातील जनसेवकांनी फुलवला कोविड सेंटर मध्ये भावभक्तीचा मळा…

नितीन माळे

चाळीसगाव – आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयामार्फत मार्च महिन्यात पहिला लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जनतेच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात ई पास काढण्यापासून ते आर्सेनिक अल्बम औषधी वाटप पासून अन्नसेवा पुरविणे असो, कार्यालयात काम करणाऱ्या जनसेवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली आणि त्यातच कार्यालयातील काही कर्मचारी बाधित झाले होते. काही दिवसांपूर्वीच कार्यालयातील दोन जनसेवक पवन देवरे व योगेश महाजन आणी योगेश महाजन यांचा लहान भाऊ राजेंद्र हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर नवीन ग्रामीण रुग्णालयात कार्यान्वित कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

गेल्या २ दिवसांपासून उपचार घेत असताना त्यांच्यात असलेला जनसेवा करण्याचा पिंड काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आपणदेखील येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी काहीतरी करावे अशी भावना त्यांनी कार्यालयाचे समन्वयक संदीप भावसार यांना बोलून दाखवली. त्यांनी देखील त्याला होकार देत आपण भजनांचा कार्यक्रम कोविड सेंटर मध्ये करू असे सर्वानुमते ठरले. योगेश महाजन हा वारकरी कुटुंबातील असून त्यांचा स्वतःचा बँड असल्याने त्याचे गायन देखील चांगले होते तर पवन देवरे याला बऱ्यापैकी पखवाज वाजवता येत असल्याने त्यांनी देखील यात उत्साह दाखवला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी पी बाविस्कर, डॉ. अभिजीत देशमुख व समन्वयक रणजित गव्हाळे यांनीदेखील त्यांच्या संकल्पनेचे स्वागत केले. मग सुरू झाली भजनासाठीच्या साहित्याची जमवाजमव… संदीप भावसार यांनी त्यांच्या संपर्कातील वारकरी मंडळाकडून मृदंग, टाळ व कार्यालयातील साउंड सिस्टम उपलब्ध करून दिली आणि मग संध्याकाळी रंगला हरिनामाचा सोहळा…
कोविड सेंटर मधील रुग्णांची मोकळ्या जागेत अंतर ठेवून रांगेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली त्यांच्या हातात टाळ देण्यात आले.
विठ्ठल माझा माझा…हरीपाठ… ज्ञानोबा माऊली तुकाराम…म्हणत वैद्यकीय कर्मचारी, रुग्ण हे हरिनामात तल्लीन झाल्याने जणू कोविड केअर सेंटर मध्ये भावभक्तीचा मळा फुलला असल्याची प्रचिती येत होती.
एक विरंगुळा, तणावमुक्ती व आजाराविषयीची भीती दूर करण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयातील जनसेवकांनी राबविलेल्या उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत वैद्यकीय अधिकारी डॉ.बाविस्कर यांनी व्यक्त केले. तुम्ही कुठेही असा पण जनतेच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी काम करा अशी प्रेरणा आम्हाला आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यापासून मिळाल्याने आम्ही हा उपक्रम करू शकलो, आणि आम्ही कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असेपर्यंत सकाळ-संध्याकाळ हरिनाम आणि काकड आरती चालू ठेवणार आहे अशी माहीती उपक्रम राबविणारे पवन देवरे व योगेश महाजन यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button