नव उद्योजकांना प्राधान्याने कर्ज उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
गणेश ढेंबरे / औरंगाबाद
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षीत युवक युवतींना व्यवसाय उभारणीसाठी प्राधान्याने कर्ज उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय छाननी व समन्वय उप समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दीपक शिवदास, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महाडीक, सहायक आयुक्त वाबळे, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात उद्योगधंदे उभारणी झाली तरच रोजगार निर्मिती होईल हे लक्षात घेऊन या कार्यक्रमाअंतर्गत सुशिक्षीत युवक युवतींना कर्ज उपलब्ध करुन त्यांना व्यवसाय उभारणीसाठी प्राधान्याने कर्जाचा पुरवठा करण्याचे निर्देशित केले. तसेच सर्व बँकांच्या जिल्हा समन्वयकाने प्राधान्याने जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्याकडे लक्ष द्यावे. नव उद्योजकांनी उद्योग उभारल्यास त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होऊन आर्थिक उन्नती साध्य करता येईल. यादृष्टीने सर्व बँकाच्या विभागीय महाव्यवस्थपकांना पत्र पाठवून वेळोवेळी पाठपुरावा करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.






