सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या
गणेश ढेंबरे / औरंगाबाद
पैशासाठी पतीसह सासरच्या मंडळीकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून सात महिन्याच्या गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हनुमाननगर येथे घडली. या घटनेनंतर विवाहितेच्या वडिलांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिसांनी पतीसह सासू, सासरा आणि नणंदा अशा सहा जणांंविरोधात हुंडाबळी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. पूजा अमोल त्रिभुवन (वय २०, रा. हनुमाननगर ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पूजा आणि अमोल यांचा मागील वर्षी महांकाळ वडगाव (ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) येथे विवाह झाला. दीड तोळ्याची अंगठी आणि ३५ हजार रुपये हुंडा पूजाच्या आईवडिलांनी आरोपीला दिला होता.
लग्नानंतर तीन महिने चांगले वागविल्यावर आरोपींनी काहीतरी व्यवसाय करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करून तिचा छळ सुरू केला. ही बाब पूजाने आई, वडील आणि भावाला फोन करून सांगितली. यानंतर त्यांनी आरोपींना समजावून सांगितल्यानंतरही त्यांच्याकडून तिला त्रास सुरूच होता. पूजा गर्भवती असून ती लाडकी असल्याने तिचे वडील पैसे देतील, अशी त्यांना अपेक्षा होती. तिच्या वडिलांनीही आरोपींना पैसे देण्यासाठी शेती विकण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, त्रास वाढतच असल्याने पूजाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याविषयी पूजाचे वडील सुभाष यादव महांकाळे यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.






