भाजप सरचिटणीसाला सेना कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरात लसीकरण केंद्रावर भाजपचे सरचिटणीस गोविंद केंद्रे आणि शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी गोविंद केंद्रे यांना गाडीत घालून शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर घेऊन जाण्यात आले. तेथे गेल्यावर केंद्रे यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या मारहाणीत केंद्रे जबर जखमी झाले. त्यामुळे त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गोविंद केंद्रे यांना मारहाण झाल्याने भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. तसेच भाजप नेत्यांनी या मारहाण प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन देखील केले. तसेच शिवसेनेचे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन पोलिसांना यावेळी देण्यात आले आहेत.






