?️अमळनेर कट्टा..आजपासून सुरू करत आहोत मुतारी सिरीज..काहो दादा; खरं शे का?अमळनेरमा मुतारी गयी चोरीले
– अमळनेरमध्ये टॉयलेट एक प्रेमकथा..
अमळनेर । येथील नगरपालिकेच्या अखत्यारितील श्री.गुरूनानक शॉपिंग सेंटरमधील व परिसरातील एकमेव असलेले सार्वजनिक शौचालय (मुतारी) जमीनदोस्त करून त्यावर दोनही बाजुंनी दुकानांचे बांधकाम सुरू आहे. लोकांना पूर्वीच्या जागी शौचालय सापडत नसल्याने ते चोरीस गेल्याची एकच चर्चा अमळनेरात रंगली आहे. या कृतीमुळे या संकुलातील व्यापार्यांची, त्यांच्याकडील कर्मचार्यांची आणि तालुकाभरातून येथे दाखल होत असलेल्या ग्राहकांची कुचंबणा व प्रचंड गैरसोय होत आहे.
विशेष म्हणजे या संकुलात टॉयलेट एक प्रेमकथा खुलेआम सुरू असतानाही नगरपालिका प्रशासन, सत्ताधारी, विरोधक असे सारेच व सत्ताधार्यांचे स्वंयघोषित विकासपुरूष, कार्यकुशल संकल्पकही डोळ्याला पट्टी व तोंडाला कुलूप लावून आहेत. कोणीही आवर घालायला तयार नसल्यानेच मुतारी पाडून जी दुकाने थाटण्यात येत आहेत त्यातून निघणार्या शिवांबूचा(मूत्र) सर्वांना लाभ होणार असा भपका सुटला असून म्हणूनच ही मिलीभगत असल्याची चर्चा अमळनेरकरांमधून होत आहे.
आता यातील लाभार्थी शिवांबू उपासक कोण कोण आहेत हा संशयाचा आणि संशोधनाचा विषय आहे. दरम्यान, शिवांबू किंवा मूत्र चिकित्सा ही स्वतःचे मूत्र प्राशन करण्याची व इतर बाह्य उपचारांकरिता वापरण्याची एक उपचार पद्धत आहे. स्वमूत्राचे नियमित सेवन करण्याने सर्व प्रकारचे रोग बरे होतात व दीर्घायुष्य प्राप्त होते असा शिवांबू चिकित्सेच्या समर्थकांचा दावा आहे. मात्र भ्रष्टाचारी पिपासू ढेकणांना सर्व वर्ज्य कुठं असतं. असो.
सत्ताधारी आणि विरोधी गटाची मिलीभगत..!
अमळनेर नगरपरिषदेच्या सत्ताधारी आणि विरोधी गटात सध्या साटं लोटं सुरू असल्याचे सर्वच नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.विविध विकास कामांमध्ये एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या तत्वावर सध्या नगरपरिषदेच्या निधीच व्यवस्थित वाटप सुरू आहे. अमळनेर नगरपरिषदेच्या कोणत्याही कामात अडथळा आणायचा नाही,गुपचूप बसायचं कोणताही मुद्दा उचलायचा नाही..यासाठी मुतारींवर दुकान बांधून देत आवाज बंद करण्याचा हा एकच प्रकार नसून सर्रास पणे नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेक केली जात आहे. आता शॉपिंग मधील दुकानदारांनी “मुतायला” कुठे जायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.मूत आणि संडास देखील पुरत नाही..! आता विकली मुतारी आता आणखी काय काय आहे बाकी..! हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. खुल्या भूखंडा च्या विक्रीचा मुद्दा लवकरच ठोस प्रहार समोर आणणार आहे.
अमळनेर खरचं हागणदारीमुक्त?
शौचालयांअभावी कुंचबना होऊ नये म्हणून केंद्र व राज्य शासनाने पालिकांना केवळ प्रोत्साहनच नाही तर आर्थिक योगदानही देऊ केले आहे. मात्र या संकुलात मुतारी हटवत दोनही बाजूंनी दुकाने थाटली जात आहेत. त्यामुळे लघवी करण्यासाठी फिरफिर होणार आहे. मुतारीच नसल्यावर वाटेल तेथे धार मारत अस्वच्छताच पसरणार आहे. या प्रकारामुळे समस्त अमळनेरकरांचेच सार्वजनिक आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यातच अमळनेर नगरपालिकेला हागणदारीमुक्त जाहीर केले असून त्याचा टेंभा गेल्या अनेक दिवसांपासून मिरवला जात आहे. मात्र, अमळनेर खरेच हागणदारीमुक्त झाले आहे का? हा प्रश्न असल्या प्रकारांमुळे ऐरणीवर आला आहे. अमळनेरकरांसाठी ही नक्कीच भूषणावाह बाब नाही.






