महानगर पालिका आयुक्तांना लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सादर.
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : बांधकाम परवाना सुलभ करावा व निर्माण चौक मैदानास संरक्षित भिंत बांधण्याची मागणी.
कोल्हापूर: लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त नितीन सरदेसाई यांना देण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून बांधकाम परवाना विभागातील अधिकारी व कर्मचारी मतदार यादी करण्याच्या कामात व्यस्त असल्याने या विभागाकडे अनेक बांधकाम परवाना फाईल पडून आहेत . तसेच बांधकाम परवाना कागदपत्रांची गुंतागुंत कमी करून बांधकाम परवानगी प्रक्रिया सुलभ करून नागरिकांचा वेळ व खर्च वाचविण्यात यावा. कोल्हापूर शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन सध्या राजारामपुरी येथे एकाच ठिकाणी असणारे बांधकाम परवाना कार्यालयाचे काम चार विभागीय कार्यालयात विभागून कामात सुसूत्रता आणण्यात यावी. यासाठी बांधकाम परवाना विभागाकडे सर्व्हेअर, जूनियर इंजीनियर व अन्य कर्मचारी स्टाफ वाढविण्यात यावा. निर्माण चौक मैदानावर अतिक्रमण वाढत असून भविष्यात कोल्हापूर महानगरपालिकेची मध्यवर्ती प्रशासकीय इमारत या ठिकाणी होण्याची शक्यता असल्याने सदरच्या मैदानाभोवती तात्काळ संरक्षण भिंत बांधण्यात यावी. आदी विविध मागण्यांचे निवेदन लोकराज्य जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांना देऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पक्षाचे शहर सरचिटणीस हिंदुराव पोवार , अशोक तोरसे, सर्जेराव भोसले, शहर संघटक शशिकांत जाधव, संतोष बिसुरे , सुनील कुंभार, बाळकृष्ण गवळी, अमोल कांबळे, अनिल कुंभार, सुधाकर डोनोलीकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






