Pune

उस्मानाबादकरांची भिस्त जावायांवरच !

उस्मानाबादकरांची भिस्त जावायांवरच !

दत्ता पारेकर
पुणे- मंत्रीमंडळ विस्तारात उस्मानाबादची झोळी रितीच राहिली आहे़ मात्र तीन- जावई मंत्री झाल्याने त्यावरच नागरिकांना समाधान मानावे लागले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील चारपैकी कधी नव्हे ते पहिल्यांदाच तीन जागा शिवसेनेच्या पदरी पडल्या आहेत़ त्यामुळे एकतरी मंत्रीपद विस्तारात जिल्ह्याला नक्कीच मिळेल, अशी आशा सेना पदाधिकाऱ्यांना होती. मात्र, सोमवारच्या मंत्रीमंडळ विस्तारात उस्मानाबादच्या पदरी निराशा पडली़ एकही मंत्री न झाल्याचे दु:ख व्यक्त होत असतानाच उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी, उपळे या तीन अगदी लगतच्याच गावांमध्ये मात्र, आनंद ओसंडून वाहत होता़ त्याला कारणही खासच आहे़ विस्तारात या तीन गावांतील जावयांनी शपथ घेतली आहे़ तेर ही अजित पवार यांची सासरवाडी़ माजी मंत्री डॉ़पद्मसिंह पाटील यांच्या चुलत भगिनी सुनेत्राताई यांच्याशी त्यांचा विवाह झालेला़ आता अजित पवारांच्या हाती सत्तेची दोर आली असल्याने तेरमध्ये उत्साह आहेच़ मात्र, राणाजगजितसिंह पाटील हे आता भाजपात गेले असल्याने हा उत्साह रस्त्यावर आला नाही, इतकेच.

राजेश टोपे हेही इकडचेच जावई़ उपळे ही टोपेंची सासरवाडी़ येथील जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विक्रम पडवळ हे त्यांचे सासरे़ टोपे मंत्री झाल्याचे समजल्यानंतर रात्री सर्व कुटूंबियांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला़ तिसरे जावई मंत्री प्राजक्त तनपुरे यांची सासरवाडी ही ढोकी गावची़ तेर पासून अवघ्या ८ किमी अंतरावर असलेल्या ढोकीतील उद्योगपती सुभाष देशमुख हे त्यांचे सासरे आहेत़ तनपुरे मंत्री झाल्याचे समजल्यानंतर सायंकाळी घरासमोर फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button