Nashik

दिव्यांग, अल्पभूधारक  शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा — पैशांचे पाकीट केले परत 

दिव्यांग, अल्पभूधारक शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा — पैशांचे पाकीट केले परत
सुनिल घुमरे

नाशीक जिल्ह्यातील
मोहाडी: (ता.दिंडोरी) येथील शेतकरी परसराम मुरलीधर तिडके यांना शुक्रवार (ता.१७) रोजी सकाळी शेतातून गावात येत असतांना पैशाचे पाकीट रस्त्यात पडलेले दिसले. तिडके यांनी पाकीट तपासून पाहिले असता त्यात तीन एटीएम, वाहन परवाना सह इतर कागदपत्र व मोठी रक्कम असल्याचे आढळून आले. रक्कम पाहूनही तिडके यांना मोह झाला नाही. त्यांनी तात्काळ ही बाब आपले मित्र शिक्षक धनंजय वानले यांना फोन करून सांगितली. कागदपत्र तपासून पाहिले असता त्यावरील पत्त्यानुसार ते पाकीट अभिजीत फोपसे राहणार संगमनेर यांचे असल्याचे निदर्शनास आले. परंतु त्यावर संपर्क क्रमांक नसल्याने श्री वानले यांनी सदर बाब मोहाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड यांच्या निदर्शनास आणून देऊन व्हाट्सअप वर टाकली. सदर बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई नाका येथील सॉफ्टवेअर कंपनीत कर्मचारी असलेले अभिजीत फोपसे यांना बंधू हर्षल फोपसे यांच्यामार्फत समजली. त्यांनी संपर्क साधून सदर पाकीट माझेच असून गुरुवारी संध्याकाळी जत्रा हॉटेल परिसरातील मेडिकलमध्ये गेलो असताना सदर पाकीट नकळत रस्त्यात पडले असता शोध घेऊनही सापडले नाही म्हणून लगेचच अमृतधाम- आडगाव पोलीस स्टेशन येथे अर्ज दिला असल्याचेही सांगितले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आव्हाड यांनी आडगाव पोलीसांशी संपर्क साधून व सर्व चौकशी करून पाकीट फोपसे यांना परत केले.परंतु सदर पाकीट नाशिक येथून मोहाडी येथे रकमेसह कसे आले याचे कोडे मात्र उलगडले नाही.यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अरूण आव्हाड,धनंजय वानले सह शिवाजी ढेपले,सचिन देशमुख,सुनील जाधव,रमेश जाधव, स्वप्नील जाधव, वैभव जाधव यांनी सहकार्य केले .

चौकट
परसराम तिडके हे अल्पभूधारक,पायाने दिव्यांग शेतकरी असून त्यांची कष्टाने पिकवलेली द्राक्षबाग इतरांप्रमाणे कोरोना साथीच्या लॉकडाऊनमुळे मातीमोल झाली आहे. परंतू अशा संकटाच्या काळातही मोठी रक्कम पाहूनही त्यांना मोह झाला नाही.त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना बक्षीस देऊ केले असता त्यांनी नम्रपणे नकार देऊन सदर रक्कम कोरोना मुख्यमंत्री सहाय्य निधीमध्ये जमा करण्याची इच्छा व्यक्त केली.तिडके यांचा प्रामाणिकपणा व सामाजिक बांधिलकीबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

मोहाडी: फोपसे यांना पाकिट परत करताना परसराम तिडके, पोलीस उपनिरीक्षक अरूण आव्हाड, धनंजय वानले आदी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button