Mumbai

खावटी अनुदान योजनेच्या अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी शुभारंभ  आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी

खावटी अनुदान योजनेच्या अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी शुभारंभ आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुसूचित जमातीसाठी जाहीर केलेल्या पॅकेज अंतर्गत खावटी अनुदान योजनेचे निधी वितरणांचा शुभारंभ उद्या, महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री ऍड. के.सी. पाडवी यांनी दिली आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आदिवासी जमाती सर्वात जास्त प्रभावित झाली आहे. आदिवासी जमातीत मजुरांची संख्या जास्त असल्याने अश्या परिस्थितीत त्यांना खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल २०२१ रोजी जाहीर केलेल्या कोरोना मदत पॅकेज अंतर्गत या निधीचे वाटप उद्या, महाराष्ट्र दिनापासून करण्यात येणार आहे.

श्री. पाडवी म्हणाले की, कोविड १९ च्या साथरोगामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि कडक निर्बंधामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फटका बसलेल्या राज्यातील आदिवासी कुटुंबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच आर्थिक मदत पुरवण्याची खावटी योजना पुनर्जीवित करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि किराणा वस्तुचे वितरण असे या योजनेचे स्वरूप आहे.

दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते या निधीचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री ऍड. के.सी. पाडवी, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदी उपस्थित राहणार आहेत.

*अशी आहे खावटी योजना*

1) आदिवासी विकास विभागाची खावटी कर्ज योजना सन २०१३ नंतर बंद झाली होती. या योजनेऐवजी कोरोना कालावधीसाठी ‘खावटी अनुदान योजना’ सुरु केली.
2) या योजनेत लाभार्थी आदिवासी कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंसोबत रोख पैसे देण्यात येणार असून यासाठी सुमारे 486 कोटी रु. खर्च अपेक्षित आहे.
3) प्रति कुटूंब एकूण ४ हजार रुपये देण्यात येणार असून त्यापैकी 2 हजार रुपये पात्र लाभार्थी कुटूंबाना बँक खात्यात ‘थेट लाभ हस्तांतरण’ (DBT) या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
4) उर्वरित रु. 2 हजार किंमतीच्या किराणा वस्तू देण्यात येणार आहेत. यामध्ये मटकी, चवळी, हरबरा, वाटाणा, उडीद डाळ, तूर डाळ, साखर, स्वयंपाकाचे तेल, गरम मसाला, मिर्ची पावडर, मीठ, चहा पत्ती या वस्तूंचा समावेश आहे.
5) या योजनेत पहिल्यांदाच अति मागास प्रवर्गातील कातकरी, माडीया ,कोलाम यांचा समावेश केला आहे.

0000
नंदकुमार वाघमारे/वि सं अ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button