पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरूळी कांचन मध्य पाणी शिरल्याने मोठी वित्तहानी
महेंद्र साळुंके
पुण्यातील हवेली तालुक्यात रविवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्रीनंतर एक ते दोन तासांत हवेली तालुक्यात तुफान पाऊस पडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या उरूळी कांचन येथील मंडई पाण्याखाली गेली आहे. या भागातील रस्त्यांवरून पाण्याचे अक्षरश: लोंढे वाहत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हवेली तालुक्यातील सर्व परिसरांमध्ये साधारण हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता याठिकाणी नेमके किती नुकसान झाले आहे, हे पाहावे लागेल.
दोन दिवसांपूर्वीच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणाला अतिवृष्टीचा तडाखा बसला होता.
यामध्ये शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती. तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठी वित्तहानी झाली होती.
दरम्यान, हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस होण्याची अंदाज वर्तवला आहे. बंगलाच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे 21,22 आणि 23 ऑक्टोबरला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.






