तीन मेंढ्या चार कोकरी किंमत ११ लाख ११हजार
दत्ता पारेकर पुणे
पुणे : उष्ण तापमान, अवर्षणप्रवण क्षेत्र, वारंवार उद्भवणाऱ्या चाराटंचाई परिस्थितीत गाई, म्हैस व शेळ्यांच्या तुलनेत प्रतिकूल वातावरणात तग धरणारा मेंढी हा एकमेव प्राणी आहे.गरीबाची गाय म्हणून जसं शेळीला महत्व आहे तसं धनगर समाजाची लक्ष्मी म्हणून मेंढीला अनन्य साधारण महत्व आहे.
इंदापूर तालुक्यात मेंढीपालन हा व्यवसाय जरी प्रमुख व्यवसाय नसला तरी अनेक धनगर बांधवांच्या दारात आजही ही लक्ष्मी अवरजून पहावयास मिळते. त्यातच परिस्थिती नुसार मेंढीच्या अनेक जातींपैकी अल्प काळात लाखो मिळवून देणारी जात म्हणून माडग्याळ जातीकडे पाहिले जाते.
आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून दुग्धोत्पादनासाठी अनेकांच्या दावणीला किंवा गोठ्यात हजारों रुपये किमतीच्या विविध जातीच्या हायब्रीड गायी पहायला मिळतात. मात्र अशात हजार दोन हजार नव्हे तर चक्क लाखो रूपये किमतीची अगदी दोन चार महिने वयाची मोजकी माडग्याळची कोकरे पाहयाला मिळाली तर ते नवलचं म्हणावे लागेल.
होय,इंदापूर तालुक्यातही या लाखो रुपये मिळवून देणाऱ्या आणि आपली लक्ष्मी समजली जाणाऱ्या या माडग्याळचे पाय रुतु लागले आहेत.पडस्थळ मधील पांडुरंग मारकड यांनी सांगोल्यातील मेटकरी कुटुंबातून माडग्याळ जातीच्या 3 मेंढ्या व 4 नर वाणाची कोकरी खरेदी केली आहेत. ती ही चक्क एक दोन लाखाला नव्हे तर तब्बल 11 लाख 11 हजार रूपयाला. विशेष म्हणजे त्यामधील एका नर वाणाच्या अवघ्या 4 महिने वयाच्या कोकरास मारकड यांनी 4 लाख मोजलेत.
याबाबत पांडुरंग मारकड म्हणाले,की धनगर समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मेंढीपालन आहे,गेल्या अनेक पिढ्यांपासून तो चालत आलेला पारंपारिक व्यवसाय आहे.त्यामुळे आम्ही त्याकडे आमची लक्ष्मी म्हणून पाहतो.मेंढी ही केवळ मांसाहारासाठी विकली जात नसून अनेक प्रकारे विविध पैलूंनी उपयोग आहे यामुळेचं अल्प काळात तीच्या किमती अनेक पटीने वाढल्या आहेत.सांगोल्यातील मेटकरी कुटुंब या व्यवसायात राज्यात प्रसिद्ध आहे,आणि माडग्याळ ही जात देशात प्रसिद्ध आहे म्हणूनचं खरेदीवेळी तीची किंमत न पाहता वाण पाहिला.
मेंढीमध्ये गाय, म्हैस व शेळीच्या तुलनेत कमी प्रतीच्या चाऱ्याचे सेवन करून त्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता जास्त असते. आर्थिक अडीअडचणीत तातडीने उत्पन्न देणारे मेंढीपालन इतर कोणत्याही पशुपालन व्यवसायाच्या तुलनेत किफायतशीर असून विशेषतः दुष्काळी शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न देऊ शकते.या मेंढीच्या पिल्लाची किंमत दिवसागणिक वाढत जाते.या जातीच्या मेंढ्यांवमचा पांढरा रंग व त्यावर तपकिरी रंगाचा भाग, फुगीर नाक, लांब पाय, निमुळती व लांब मान अशी वैशिष्ट्ये असून शिंगे नसलेली ही मेंढी, काटक व अवर्षण स्थितीत टिकाव धरून राहण्याची क्षमता असलेली आहे.आतापर्यंत दोन महिन्याचे पिल्लू १० लाख ५हजार इतक्या उच्च किमतीला विकले गेले असल्याचे मेंढपाळ बंडु मेटकरी व तानाजी मेटकरी यांनी सांगितले.






