India

National No Bra Day: भाग-1: बाई, ब्रा समज आणि गैरसमज…कर्करोग होतो…आणि इतर प्रश्न….

National No Bra Day: भाग-1: बाई, ब्रा समज आणि गैरसमज…कर्करोग होतो… आणि इतर प्रश्न….

सोशल मीडियात ब्रा या विषयावर उडालेल्या धुराळ्यामुळे बऱ्याच जणी ब्रेसीयरच्या वापराबाबत बुचकळ्यात पडल्या आहेत. त्यांच्या शंका दूर करण्यासाठी हा लेखप्रपंच.

महिलांमध्ये स्तनांच्या आरोग्याबाबत खूप गोंधळ आणि शंका असतात. विशेषत: ‘ब्रा’ घालण्याबाबत तर अनेक समज-गैरसमज आहेत.

ब्रेसिअरमुळे महिलांना त्यांचे कपडे योग्य आणि आरामदायक पद्धतीने घालण्यासाठी मदत होते.

अगदी शाळा-महाविद्यालयीन मुलींपासून ते नोकरदार महिलांपर्यंत बहुतेक जणी रोज ब्रा घालतात. पण तरीही ब्रा वापरण्याबद्दल त्यांच्या मनात अनेक शंका आहेत.

दरवर्षी 13 ऑक्टोबर हा ‘नो ब्रा डे’ म्हणून साजरा केला जातो. महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि महिलांना त्यांच्या स्तनांची तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

त्या दिवशी महिला ब्रा घालत नाहीत आणि स्तनांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी मोहिमा राबवल्या जातात.

पण ब्रामुळे स्तनाचा कर्करोग होतो, याविषयी ठोस वैद्यकीय पुरावा नाहीये. अर्थात, आता ‘नो ब्रा डे’ हा केवळ आरोग्यविषयक संकल्पनांपुरता मर्यादित राहिला नाहीये, तर तो लैंगिक समानतेशीही जोडला गेला आहे. पण काही महिला अशाही आहेत, ज्या केवळ त्यांना अस्वस्थ वाटतं, आरामदायक वाटत नाही म्हणून ब्रा घालत नाहीत.

ब्रा वापरण्याची किंवा न वापरण्याची कारणं वेगवेगळी असली, तरी एक शंका अनेक जणींच्या मनात डोकावून जाते. ती म्हणजे दीर्घकाळ ब्रा घातली नाही तर शरीराच्या रचनेत बदल होतील का आणि स्तन सैल होतील का?

खरंच ब्रा घातल्याने किंवा न घालण्याने स्त्रीच्या शरीररचनेत बदल होतो का? स्त्रियांना त्यांच्या स्तनांबद्दल कोणत्या गोष्टी माहीत असाव्यात? डॉक्टर काय म्हणतात?

आपलं शरीर समजून घेणं गरजेचं.. डॉ अंजली चव्हाण स्त्री रोग तज्ञ

“असे अनेक गोंधळ टाळण्यासाठी आपल्याला प्रथम आपले शरीर समजून घेणे आवश्यक आहे. विशेषत: स्त्रियांना त्यांच्या स्तनांबद्दल माहिती असायला हवी,” असं स्त्रीरोगज्ज्ञ सांगतात.

“महिलांचे स्तन चरबी आणि ऊतींनी बनलेले असतात ज्यामध्ये स्तन ग्रंथी असतात. ज्याप्रमाणे तोंडाच्या भागात लाळ शोषण्यासाठी काही ग्रंथी असतात, त्याचप्रमाणे स्तनांमध्ये दूध स्रवण्यासाठी ग्रंथी असतात.

काही जणींच्या स्तनांमध्ये ऊतींचे प्रमाण जास्त आणि फॅटी टिश्यू कमी असू शकतात. इतरांमध्ये जास्त फॅटी टिश्यू आणि स्तन ग्रंथी असलेल्या ऊती कमी असू शकतात. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या रचनेनुसार ते बदलते.”

या ऊती नैसर्गिकरित्या वयानुसार कमी होतात. याचा अर्थ वयोमानानुसार स्तनांची झीज होणे स्वाभाविक आहे.त्यामुळे तुम्ही ब्रा घातली नाही, तर तुमचे स्तन सैल होतील हे म्हणणं योग्य नाही.

त्याचप्रमाणे घट्ट ब्रा घातल्याने स्तनाचा कर्करोग होऊ शकतो हे म्हणणंही खरं नाही. जेव्हा खूप घट्ट अंतर्वस्त्रं घातली जातात तेव्हा त्यांचं त्वचेसोबत घर्षण होतं. घामामुळे त्या भागात खाज सुटणे आणि चिडचिड होऊ शकते. सतत खूप घट्ट ब्रेसिअर घातल्याने स्तनांमध्ये भागात वेदना होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी योग्य आकाराच्या ब्रा निवडून त्या परिधान कराव्यात. यामुळे स्तनाचा कर्करोग होईल अशी भीती बाळगण्याची गरज नाही.

मोठे स्तन असलेल्या स्त्रियांसाठी स्तन ओघळणे नैसर्गिकरित्या घडणे सामान्य आहे. त्यांना त्यामुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. म्हणून जेव्हा ब्रा घातल्या जातात तेव्हा त्यांना आधार मिळतो. यामुळे पाठदुखीसारख्या समस्या टाळता येतात. पण आपण हे समजून घेतले पाहिजे की ब्रा घालणे हे सहसा तात्पुरत्या आरामासाठी असते. जर तुम्हाला त्यात अस्वस्थ वाटत असेल तर त्या घालण्याची गरज नाही.शरीरात नैसर्गिकरित्या होणारे बदल स्वीकारण्याइतपत लोक प्रौढ झाले पाहिजेत.

बाळंतपणानंतर ब्रेस्ट फिडींग आवश्यक आहे त्यामुळे तिहेरी फायदे होतात.बाळाचे आरोग्य, आईचे आरोग्य आणि बाईचा शरीराचा शेप व्यवस्थित राहतो.

ब्रेसीयर वापरण्याचे फायदे..

१.स्तन हा मेद पेशींनी बनलेला अवयव आहे.त्यात आधार देणाऱ्या काही लिगमेंट्स असतात पण त्या खूप बळकट नसतात. विशेष करून एकदा स्तनाचा आकार वाढला की बाहेरून वेगळा आधार गरजेचा असतो. गरोदरपणात व स्तनपान चालू असताना हा आधार न मिळाल्यास स्तन ओघळू शकतात . आणि एकदा ओघळले की त्यानंतर प्लास्टिक सर्जरी शिवाय दुसरा उपाय करता येत नाही.

२.स्तनांना नीट आधार न मिळाल्यास स्तनदुखी सुरू होते. ही स्त्रियांमध्ये नेहेमीच आढळणारी समस्या आहे. यामध्ये योग्य मापाची ब्रा वापरणे आवश्यक आहे.
खेळाडू स्त्रियांनी स्पोर्ट्स ब्रा वापरणे हितकारक आहे.
ब्रेसीयर च्या वापरामुळे स्त्रीचे पोस्चर म्हणजे उभे राहणे आणि बसणे याची पद्धत सुधारते. पाठीचा कणा सरळ राहण्यास मदत होते आणि त्यामुळे पाठीची आणि मानेची दुखणी कमी होऊ शकतात.

३.ब्रेसियरची निवड
९५% भारतीय स्त्रिया चुकीची ब्रा वापरतात असं लक्षात आले आहे. साधारणपणे कुठलाही विचार न करता अंदाजाने साईझ ठरवून मिळेल ती ब्रेसियर विकत घेण्याचा स्त्रियांचा कल आहे. हे स्तनाच्या आरोग्याच्या दृष्टीने सुध्दा चुकीचे आहे. ब्रा निवडण्यासाठी तीन साधे नियम आहेत.

१)कप साईझ निवडताना कप मोकळाही राहू नये तसेच ब्रेस्ट कोंबून बसवली जाऊ नये. कप साईझ A, B, C, D, E ट्रायल करून घ्यावेत.
२) ब्राचे खांद्यावरचे पट्टे त्वचेत रुतु नयेत तसेच निसटून येतील इतके सैलही नसावेत.
३)ब्राचे ३०, ३२, ३४ हे साईझेस ब्रेस्टच्या खालच्या भागाचे असतात. त्याचीपण व्यवस्थित ट्रायल घ्यावी. स्त्रीला श्वास व्यवस्थित घेता यायला हवा व कुठलेही वळ छातीवर पडू नयेत.
ब्रेसीयर चं मुख्य काम ब्रेस्ट ना योग्य तोआधार देणं हे असतं. काही जणी हेच विसरतात आणि खूप सैल ब्रा घालतात.ब्रेस्ट चा आकार सुदौल दिसावा यासाठी ब्रा चे पट्टे ऍडजस्ट करणं गरजेचं आहे.

४.मानवी शरीरात अनेक आकार प्रकार असतात.प्रत्येक स्त्रीला सुदौल स्तन असतीलच असं नाही.अशा वेळी ब्रेसीयर मुळे स्तनाचा आकार आणि उभार चांगला दिसल्यामुळे स्त्रीला नक्कीच आत्मविश्वास निर्माण होतो हे नाकारता येणार नाही.

५.ब्रेसीयर रात्री झोपताना नक्कीच काढून ठेवावी.तसेच सैल झालेल्या ब्रेसीयर वेळेवर बदलणे पण आवश्यक आहे.

६.दिवसा ब्रेसीयर वापरताना जर आवळल्याचा फील येत असेल आणि खूप अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुमचा ब्रा साईझ चुकला आहे असं समजायला हरकत नाही.

७.ब्रेसीयर मुळे काही जणींना त्रास होत असेल तर ब्रा ची निवड योग्य रीतीने करणे किंवा त्याही पेक्षा महत्वाचे स्तन संबंधी काही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जाणे उत्तम.अजून एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वजनावर नियंत्रण असेल तर स्तनाच्या समस्या कमी होतात .लठ्ठपणामुळे बोजड झालेल्या स्तनांना ब्रा चा आधार अत्यंत गरजेचा असतो.

उद्याच्या भागात.. स्तनांचा कर्करोग

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button