औरंगाबादमध्ये प्रशिक्षणाचा ‘पायलट प्रोजेक्ट’ राबवण्यासाठी ‘सारथी’चे नियोजन..
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : औरंगाबाद औद्योगिक विकासाचे महत्त्वपूर्ण ठिकाण असून उद्योग क्षेत्राला उपयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी राबवणे हे प्रशिक्षणार्थींना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास पुरक ठरणारे आहे.
त्या पार्श्वभूमिवर छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या (सारथी) मार्फत औरंगाबादमध्ये मराठा समाजातील युवक-युवतींसाठी प्रशिक्षणाचा ‘पायलट प्रोजेक्ट राबवण्याचे नियोजन असल्याचे, संस्थेचे संचालक उमाकांत दांगट यांनी आज येथे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सारथीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत दांगट बोलत होते.
यावेळी सारथी संस्थेचे संचालक मधुकर कोकाटे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, कौशल्य विकासचे बी. एन. सुर्यवंशी यांच्यासह उद्योजक मुकुंद कुलकर्णी, रमण आजगावकर, प्रसाद कोकील, राहुल मोगले, अर्जुन गायकवाड उपस्थित होते.






