Nashik

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे : पालकमंत्री छगन भुजबळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिक -: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या गणेशोत्सव काळात नागरिकांनी गर्दी टाळावी आणि या काळात प्रशासनाच्या पातळीवर संबंधित यंत्रणांमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना सहकार्य करावे. त्यासोबतच ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये, यासाठी प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांबाबत झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी बैठकीसाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, कोरोना बाधित रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याने जिल्ह्याचा कोरोना बाधित रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८१टक्क्यांपर्यंत वाढण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे मृत्यूदर ही २.५६ टक्के झाला आहे, असे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

मालेगावमध्ये रुग्ण संख्या जरी काही प्रमाणात वाढत असले तरी त्यापैकी ७० टक्के बरे झाले असून सध्या ७१४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मालेगावमधील मृत्यूदर पूर्वीपेक्षा कमी होत चालला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना

गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी मूर्ती विसर्जनासाठी अडचणी निर्माण होऊ यासाठी महानगरपालिकेमार्फत 23 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. सदर जागांचे ‘विघ्नहर्ता’ या ॲपद्वारे ऑनलाईन मॉनेटरींग करण्यात येत आहे. कोविड रूग्णालयांमध्ये बिलांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या बिटको व झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन टँकची व्यवस्था करण्यात येत असून बिटको रूग्णालयात अतिदक्षता विभाग व ऑक्सिजन मिळून 200 बेडस् तयार करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कोविड केअर सेंटर मध्ये सद्यस्थितीत एक हजार ११७ बेड शिल्लक आहेत, त्याप्रमाणे झिरो मिशन अंतर्गत आतापर्यंत ४५ हजार लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी साधारण साडेपाच हजार पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तसेच शहारातील झोपडपट्टी भागातील बाधित रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

पोलीस विभागामार्फत ३८ हजार गुन्ह्यांची नोंद

पोलीस विभागामार्फत आतापर्यंत कलम १८८ अंतर्गत ३८हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून संबधितांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी यावेळी दिली.
ग्रामीण भागातही गणेशोत्सव काळात गर्दी होऊ नये यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिह यांनी यावेळी दिली.

जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा उपचार पद्धती

जिल्हा शासकीय रूग्णालयात प्लाझ्मा उपचार पद्धती येत्या दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये साधारण 300 स्वॅबची तपासणी करण्यात येत असून 20 व्हेंटीलेटर बेडस् कार्यान्वित आहे, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगदाळे यांनी सांगितले.

ग्रामीण भागांमध्ये रूग्णांची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी प्रयत्न

ग्रामीण भागात प्रत्येक रूग्णाला योग्य उपचार मिळण्यासाठी व त्यांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सी, अर्सेनिक अल्बम अशा औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. आज ग्रामीण भागात एक हजार पाचशे रूग्णांवर उपचार सुरू असून सहाशे रुग्णांचे घरीच विलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी बैठकीत सादर केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button