Kolhapur

जागतिक अन्न दिनानिमित्त समाजात जागरूकता वाढविणे गरजेचे

जागतिक अन्न दिनानिमित्त समाजात जागरूकता वाढविणे गरजेचे

कोल्हापूर -सुभाष भोसले
16 ऑक्टोबर हा दिवस सपूंर्ण जगभर अन्न दिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो. कारण त्याचा थेट मानवी जीवनाच्या अस्तित्वाशी संबंध आहे. अन्न सुरक्षेबाबतची एकंदर परिस्थिती पाहता समाजात अन्न दिनाबाबत जागरूकता वाढीस लागण्याची गरज आहे. अन्नधान्य मुबलक मिळायला हवे, मात्र ते स्वस्तातच हवे अशी अपेक्षा दारिद्य्ररेषेखालील माणसांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांचीच असते. मध्यमवर्गीयांना तर बाकी काही महागले तरी चालते, पण अन्नधान्य मात्र स्वस्तातच मिळायला हवे असते.हे धान्य उच्य दर्जाचे मिळायला हवे. मोबाईलपासून ते टी.व्ही., लॅपटॉपपर्यंत कोणतीही गोष्ट ते महागाईची कुरकूर न करता खरेदी करत असतात; मात्र कुटुंबाला महिन्याला चार किलो लागणारी साखर पाच रुपयांनी महागून मासिक खर्चात वीस रुपयांची वाढ झाली तरी ते महागाईच्या नावाने बोंब ठोकतात. तीच गोष्ट कांद्याच्या आणि डाळींच्याही बाबतीत घडताना दिसते. आपल्याला पगार भरपूर मिळावा, मात्र वर्षानुवर्षे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याने मात्र पंधरा-वीस वर्षांपूर्वीच्याच भावात अन्नधान्य द्यावे असे या वर्गाला वाटत असते. बाजारभावाच्या निम्म्याहून कमी पैसे शेतकऱ्याच्या हातात पडतात हे वास्तवही त्यांना नीट माहीत नसते, किंबहुना ते जाणून घेण्याची निकडही त्यांना भासत नाही.
सध्या अन्न सुरक्षेबाबत आपल्या देशातच नव्हे तर जगभर गांभीर्याने चर्चा सुरू आहे. जगभरातील अर्धपोटी, भुकेल्या लोकांची संख्या तब्बल एक अब्जावर पोचली आहे. भारताची सध्याची लोकसंख्या 1.15 अब्जाच्या दरम्यान आहे. 2050 पर्यंत म्हणजे येत्या 40 वर्षांत ती दीड अब्जांवर जाईल असा अंदाज आहे. जगाची लोकसंख्या 6.15 अब्जांवरून 9.1 अब्जांवर जाणार आहे. या लोकसंख्येला पोसण्यासाठी अन्नधान्य उत्पादनात 70 टक्के वाढ करावी लागणार आहे. सध्या आहे त्या लोकसंख्येला नियमित अन्नपुरवठा करण्याचे मोठे आव्हान असतानाच नवे आव्हान कसे पेलणार, असा प्रश्‍न आहे. तापमानवाढ, मोसमी पावसाची अनियमितता, रोग-किडींचा वाढता प्रादुर्भाव, खते-बियाण्यांसह अन्य कृषी निविष्ठांची अपुरी उपलब्धता, बाजार यंत्रणेकडून होणारी फसवणूक अशी अनेक आव्हाने खांद्यावर घेऊन शेतकरी काळ्या आईची सेवा मनोभावे करतो आहे. तो नवी आव्हाने पेलण्यासही समर्थ आहे, पण किमान पाठीवर हात ठेवून “लढ’ म्हणण्याइतके औदार्य समाजाने दाखवायला हवे. सरकारी यंत्रणेनेही त्याच्याप्रती असलेले औदासीन्य सोडायला हवे. निविष्ठांपासून ते पीक कर्जापर्यंत साऱ्या बाबींची वेळेत पूर्तता करून द्यायला हवी. “अन्नदाता सुखी भव’ म्हणून आपण यजमानांना दुवा देत असतो, पण खरा अन्नदाता शेतकरी आहे याचा विसर सर्वांनाच पडलेला असतो. या जगाच्या पोशिंद्याचे कल्याण करायचे असेल तर त्याने पिकवलेल्या मोत्यांना वाजवी किंमत देण्याची दानतही समाजाने अंगी बाळगली पाहिजे. जागतिक अन्न दिनाचा हाच संदेश असायला हवा.
अन्न हे परब्रम्ह आहे ही भावना लोकांच्या मनात रूजली पाहिजे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button