ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनवलेल्या कोरोना लसीची दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू
पुणे दत्ता पारेकर
ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनवलेल्या कोरोना लसीची दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू करण्यात आली आहे. बुधवारी पुण्याच्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये स्वयंसेवकांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा 0.5 एमएल एवढा डोस देण्यात आला, अशी माहिती डॉ. संजय ललवाणी यांनी दिली. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी स्वयंसेवकांना ही लस टोचवली.
डॉ. संजय ललवाणी याबाबत सांगितले की, लस टोचवण्यापूर्वी स्वयंसेवकांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यानंतरच त्यांना हा डोस देण्यात आला. लस टोचवल्यानंतर आता याचा त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो अथवा नाही हे पाहण्यासाठी त्यांना काही दिवस डॉक्टरांच्या निदर्शनाखाली रहावे लागणार आहे. तसेच सर्व काही सुरळीत पार पडल्यावर 28 दिवसांनी स्वयंसेवकांना आणखी लसीचा आणखी दुसरा डोस देण्यात येईल.
दरम्यान, मंगळवारी पाच स्वयंसेवकांची तपासणी करण्यात आली होती. यात तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. त्यांना आज लस देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेन्नर इन्स्टिटयूटने ही लस बनवली असून पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने याचे उत्पादन घेतले आहे. ‘कोविशिल्ड’ असे या लसीचे नाव असून याआधी याची पहिली चाचणी यशस्वी आणि सुरक्षित झाली आहे. देशभरात जवळपास 1600 जणांवर याची चाचणी घेतली जाणार आहे.






