Pune

महाराष्ट्रात मेंढपाळांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत सरकारला जाब विचारा- भाजयुमोचे तेजस देवकाते यांचे फडणवीसांना आवाहन

महाराष्ट्रात मेंढपाळांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत सरकारला जाब विचारा- भाजयुमोचे तेजस देवकाते यांचे फडणवीसांना आवाहन

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे :सध्या पावसाळा सुरु असून उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये मेंढ्या चारण्यासाठी गेलेले मेंढपाळ राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये परतताना दिसत आहेत. वेगवेगळ्या भागांमध्ये मेंढपाळ बांधवांवर जीवघेणे हल्ले होत असून मेंढपाळांना अमानुषपणे मारहाण केली जात आहे. कोणतेही नुकसान झाले नसतानाही मुजोर प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांना अडवून पैशांची मागणी केली जाते. त्यांच्या मेंढ्या बांधून ठेवल्या जातात. वेळप्रसंगी उचलून नेल्या जात असल्याचा घटना सध्या महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये घडताना दिसून येतात. या सर्व गोष्टी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या असून अशा लोकांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे.परंतु सरकार याबाबतीत कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही. त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले पाहिजे. अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तेजस देवकाते यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मेंढपाळांवर होणारे हल्ले टाळण्यासाठी व त्यांची भटकंती थांबवण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये “चराऊ कुरणे” राखीव ठेवण्याची गरज आहे .त्यासाठी शासनाने वनविभागाच्या अखत्यारीतील येणाऱ्या वन जमिनी राखीव ठेवाव्यात. तसेच त्याचा मोबदला म्हणून मेंढपाळांकडून नाममात्र रक्कम रॉयल्टी स्वरूपात घेतली जावी. त्याचबरोबर मेंढपाळांना होणाऱ्या मारहाणीपासून स्वसंरक्षणासाठी त्यांच्यावरील हल्ला अजामीनपात्र गुन्हा समजला गेला पाहिजे. मेंढपाळाना ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू केला पाहिजे. तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या साखर शाळांच्या धर्तीवर मेंढपाळांच्या मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी “आनंदशाळा”ची निर्मिती केली पाहिजे. तरच त्यांची भटकंती थांबून त्यांच्या आयुष्यात काही प्रमाणात का होईना स्थिरता येईल.

महाराष्ट्रात मेंढपाळांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत सरकारला जाब विचारा- भाजयुमोचे तेजस देवकाते यांचे फडणवीसांना आवाहन

याबाबत महाराष्ट्र शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. मेंढपाळ व्यवसाय करणारा धनगर समाज हा राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मध्ये असून त्यांना त्याच ठिकाणी मेंढ्यांना चारण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्यास राज्यभर फिरण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. त्याचबरोबर त्यांच्यासाठी संरक्षित जागा ठेवल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही मदतच होईल.
याबाबत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाच्या माध्यमातून काही ठोस कृती कार्यक्रम मेंढपाळांसाठी आयोजित करावा .
याबाबत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे संबंधित मुजोर,हल्लेखोर लोकांवर कारवाई करण्याची व मेंढपाळांच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. परंतु हे सरकार मेंढपाळाच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावत असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून आपणच याबाबत सभागृहात आवाज उठवून महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मेंढपाळ समाज बांधवांना न्याय मिळवून दयावा ही अशी विनंती देवकाते यांनी देवेंद्र फडणवीस तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button