Pune

कवी मनोहर मोहरे यांनी विद्यार्थ्यांना ऐकवल्या बोधकथा

कवी मनोहर मोहरे यांनी विद्यार्थ्यांना ऐकवल्या बोधकथा

पुणे प्रतिनिधी – दिलीप आंबवणे

जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडी येथे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पठारवाडी ( चाकण ) येथील शिक्षक ,कवी मनोहर मोहरे यांनी गुगल मिटिंगवर ऑनलाइन संस्कारक्षम अशा बोधकथा ऐकवल्या.तसेच इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांना “माती आणि नाती जपणार्‍या कथा आणि कविता” या विषयावर मार्गदर्शन केले. मोहरे हे आंबेगाव तालुक्यातील दूर्गम आदिवासी भागातील फुलवडे गावचे रहिवासी असून आदिवासी जीवनावर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत .
या वेळी सर्व प्रथम इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मूल्य व संस्कार यांची समाजात असणारी गरज यासंदर्भात मार्गदर्शन केले.त्यांच्या “शाळा भरेल काय?” या कवितेने विद्यार्थ्यांच्या शाळेतील आठवणी जाग्या केल्या आणि शाळेसंबंधी आवड निर्माण केली.

त्यानंतर “खरे शिक्षण” ही बोधकथा सांगितली.या कथेतून शिक्षण कसे असावे, हे सरांनी अतिशय प्रभावीरित्या मांडले.शिक्षण हे आनंदाने व्हावे,यासाठी “हाडाचा शिक्षक” ही विनोदी कथा त्यांनी मुलांना सांगितली.या वेळी मुलांनी कथेचा मनमुराद आनंद लुटला.त्यानंतर साक्षीचा वाढदिवस ही संस्कारक्षम कथा मुलांना सांगितली. त्याने मुले भारावून गेली.त्यानंतर अजयची हुशारी,वृक्षारोपण या प्रेरणादायी कथा मुलांना सांगितल्या. कथा सांगता-सांगता मोहरे यांनी विद्यार्थ्यांना कथा लेखन विषयी मार्गदर्शनही केले.तब्बल दीड तास चाललेल्या या व्याख्यानात मुले भारावून गेली.
या वेळी सुगी या कवितेतून मनोहर मोहरे यांनी शेतकऱ्यांचे जीवन विद्यार्थ्यांपुढे सुंदररीत्या मांडले. तर मामाचा गाव आणि श्रावण या कवितेतून मुलांना निसर्गाविषयी आवड निर्माण करून नाती आणि माती यांची सांगड घालत एकत्रित कुटुंबाचे महत्त्व पटवून दिले.समाजातील जबाबदार घटक म्हणून आपण काय करावे,याची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध विनोदी लेखक,सकाळचे उपसंपादक सु. ल. खुटवड,तर प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडीचे मुख्याध्यापक,दत्तात्रय वारे गुरुजी,रयतेचा वाली डिजिटल दैनिकाचे संपादक शाहू भारती,ज्ञानमंथन मासिकाचे संपादक गणेश सोळुंके,लेखक महादेव खळूरे, उत्तम सदाकाळ, कृष्णकुमार निकोडे, किशोरकुमार बन्सोड, किरण पेठे, ज्योत इमासिकाच्या संपादिका ज्योती कपिले,वाचन मित्र इनियतकालिकाचे संपादक मोरेश्वर सोनार,शिक्षण समर्थ मासिकाचे संपादक संदीप वाघोले,मराठी अभ्यासक्रम गटाचे सदस्य अरविंद मोढवे,आदर्श शिक्षक व गायक उमेश शिंदे,रानपाखरांची शाळा मासिकाचे संपादक सचिन बेंडभर,संदीप गारकर आदी मान्यवर गुगल मिटिंगवर ऑनलाइन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीची विद्यार्थिनी सिद्धी वाबळे हिने केले.एकनाथ खैरे यांनी स्वागत केले.तर साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button