ममता मेमोरियल हॉस्पिटलची कोविड केअर सेंटरची मान्यता रद्द
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : बजाजनगर येथील ममता मेमोरियल हॉस्पिटलला असलेली डेडीकेटेड कोविड केअर सेंटरबाबतीत प्राप्त तक्रारीच्या चौकशीअंती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ममता हॉस्पिटलची कोविड केअर सेंटरची मान्यता रद्द केली आहे. सध्या कोरोना साथरोगामुळे आंतररुग्ण म्हणून भरती असलेल्या रुग्णांचे पूर्ण उपचार करुन नंतरच सुट्टी द्यावी, आजपासून या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही नवीन कोरोना रुग्णास आंतररुग्ण म्हणून दाखल करण्यात येऊ नये.
कोरोना विषाणू साथरोगाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची सेवा देण्यात येऊ नये, असेदेखील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हॉस्पिटलला लेखी आदेशित केले आहे. या हॉस्पिटलविरोधात रुग्ण न्याय हक्क परिषद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यता रद्द करण्याविषयी तक्रार दाखल केली होती.
कोविड हेल्थ सेंटर सुरु करतांना लागणाऱ्या आवश्यक परवानग्या नसताना बेकायदेशीर सुरु असलेल्या हॉस्प्टिलची मान्यता रद्द करावी. गोरगरीब, शेतकरी कामगार रुग्णांची लाखो रुपयांची लुट करीत आहे. नियमाप्रमाणे पैसे न घेता मनमानी करुन रुग्णांकडून बिल घेत असल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले होते.






