अंतुर्ली रंजाणे जि.प. शाळेत क्वारंटाईन केलेल्या तिघांचा आदर्शवत उपक्रम….
रिकाम्या वेळेत करत आहेत शाळेची साफसफाई व रोपांची देखभाल….
रजनीकांत पाटील
अमळनेर :- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावात बाहेरून आलेल्या व्यक्तींना गावाच्या बाहेरील इमारतीत किंवा जि.प. शाळेत क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. अनेक जण हा वेळ अनिच्छेने काढत आहेत. तर अनेक गावात ह्या व्यक्ती क्वारंटाईन न राहता नियमाच्या विरुद्ध वागत आहेत.
मात्र तालुक्यातील अंतुर्ली येथील सागर मधुकर जगदेव, आकाश सुभाष जगदेव व निलेश माणिक पाटील या युवकांनी त्यांच्या कृतीतून आपले वेगळपण दाखवून दिले आहे. हे सुरत येथून 16 एप्रिल रोजी रोजी गावात आले. गावातील सरपंच ,ग्रामसेवक व पोलिस पाटील यांनी त्यांना जि.प. शाळेत क्वारंटाईन केले. क्वारंटाईन काळात अनिच्छेने वेळ घालवण्यापेक्षा वेळेचा सदुपयोग करून काहीतरी चांगले काम करावे अश्या विचाराने त्यांनी दररोज जिल्हा परिषद शाळेची साफसफाई करणे सुरू केले. तसेच शाळेच्या आवारात असलेल्या रोपांची काळजी घेऊन त्यांना दररोज पाणी टाकण्यास सुरुवात केली. ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेची सेवा करण्याची मिळालेली ही संधी आहे, अशी भावना या तिघांनी व्यक्त केली.
तसेच क्वारंटाईन म्हणजे आपल्याला इतरांपासून वेगळे करण्याची भावना न ठेवता आपल्या गावाच्या सुरक्षिततेसाठी आपण इथे राहत आहेत ही भावना इतरांमध्ये रुजावी अशी इच्छा ही त्यांनी व्यक्त केली.






