Ausa

अतिवृष्टीने खरीप हंगाम गेला तोट्यात रब्बी हंगामावरती धरून आशा शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी जोरात

अतिवृष्टीने खरीप हंगाम गेला तोट्यात रब्बी हंगामावरती धरून आशा शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी जोरात

प्रतिनिधी : प्रशांत नेटके औसा लामजना

औसा : औसा तालुक्‍यात ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले.डोळ्यादेखत सोयाबीनच्या बनमी पाण्यात वाहून गेल्या.शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त होऊन शेतातील माती अक्षरशः खरडून वाहून गेली. शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला. आता पावसाने झालेल्या नुकसानीचे घाव विसरून कशीबशी पैशाची जुळवाजुळव करीत शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेताची मशागत करणे, पेरणीयोग्य जमिनी तयार करण्याची लगबग सर्वत्र सुरू आहे. खरीप हंगाम तोट्यात गेल्याने आता शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बी हंगामावर आहेत.

यंदा बहरलेल्या खरीप पिकाचा घास पावसामुळे हिरावला गेला. खरीप पिके हातची गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अगदी लावलेला खर्चदेखील वसूल झाला नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था आणखी बिकट झाली आहे.

रब्बीसाठी शेतीची मशागत करण्याचे काम
लामजना ,तपसे चिंचोली , गाडवेवाडी, परिसरात गेले काही दिवसापासून सुरू आहे. शिवाय ऊनदेखील चांगले पडत आहे. त्यामुळे रब्बीसाठी शेतीची मशागत करणे सुरू आहे. शेतशिवारांत सध्या रब्बी पेरणीची तयारी जोरात सुरू आहे. सकाळपासूनच शेतकरी शेतात कष्ट करताना दिसत आहेत.

हरभरा, गहू लागवडीकडे वाढला कल

सततचा पाऊस झाल्याने परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. सिंचनाची चांगली सोय असल्याने परिसरात हरभरा, गहू ,करडई, ज्वारी लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर कल आहे.

पैशांची जुळवाजुळव करताना दमछाक

खरीप पिके हातची गेल्याने, तसेच गेल्यावर्षीही हाती काहीच लागले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे नातेवाईक यांच्याकडून उसने पासने पैसे घेऊन, रब्बीचे बी-बियाणे उधारीवर आणून ताळमेळ केला आहे. पीकविम्याचे पैसे, शासनाची नुकसानभरपाई रब्बी पिकाच्या तोंडावर मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर पैशाची टंचाई दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे तातडीने मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.दिवाळीच्या तोंडावर अतिवृष्टीची रक्कम मिळाली तर नक्कीच शेतकरी राजा आनंदाने दिवाळी साजरी करु शकेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button