Maharashtra

पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी
हवामान खात्याने उद्या (सोमवार) आणि मंगळवारीही अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे उद्या (सोमवारी) सर्व शाळा आणि महाविद्यालयानां सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले आहे.

पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

पुणे : धरणाक्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पाऊस आणि त्यामुळे नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई येथून राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या (एनडीआरएफ) दोन टिम बोलविण्यात आल्या आहेत. दरम्यान हवामान खात्याने उद्या (सोमवार) आणि मंगळवारीही अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे उद्या (सोमवारी) सर्व शाळा आणि महाविद्यालयानां सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले आहे. 
पुणे शहर आणि जिल्हयातील सर्व भागात नऊ दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. विशेषत: धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ही जोरदार पाऊस होत असल्याने पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील, तसेच मुळशी धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात नदीकाठी असलेल्या सोसायटया आणि झोपडपट्टयांमध्ये पाणी शिरले आहे. तेथील लोकांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 
दरम्यान अतिवृष्टींचा इशारा देण्यात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने मुंबई येथून दोन एनएडीआरएफच्या टिम पाचारण केल्या आहेत. सायंकाळपर्यंत त्या टिम पुण्यात दाखल होतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी दिली.
मुळशी परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या मागातील अनेक रस्ते पोलीसांच्या मदतीने वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत, असेही त्या म्हणाल्या. शिवाय पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हयातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत. आवश्‍यकता वाटल्यास आणि परिस्थीती विचारात घेऊन ही सुट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ज्या शाळांमध्ये उद्यापासून परिक्षा सुरू होत आहेत. त्यांना परिक्षा पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात येणार आहेत, असेही कटारे यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button