Kolhapur

सामाजिक बांधिलकी जपणारे उडाण फौडेंशन.

सामाजिक बांधिलकी जपणारे उडाण फौडेंशन.

सुभाष भोसले-कोल्हापूर
कोल्हापूर मध्ये आलेल्या महापुरात अनेक शेतकरी बांधवांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांची जनावरे सुद्धा मृत्यमुखी पडली. महाराष्ट्र शासनाकडून थोडीफार मदत मिळाली असली तरी नुकसानीच्या तुलनेत मदतीचे प्रमाण खुपच कमी आहे .याचं गोष्टीचा विचार करून उडान फौंडेशनचे संस्थापक भूषण लाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी महापूरग्रस्ताना सहकार्य केले. या संस्थेच्या सदस्या सौ. प्रिती देसाई यांच्या नातेवाईकांच्या मदतीने एका गरजू शेतकरी कुटुंबाला ( ज्यांचा उदरनिर्वाह म्हैशी च्या दुधावर अवलंबून होता) उडान फौंडेशनच्या माध्यमातून म्हैस घेऊन देण्यात आली.सर्व प्रथम महापुराच्या संकटामध्ये कोणत्या भागातील लोकांच्या जनावरांचे नुकसान झाले आहे किंवा जनावरे मृत्युमुखी पडली आहेत याची माहिती घेण्यात आली. राजापूर गावचे सरपंच दानु पाटील यांच्या माहिती नुसार राजापूर गावातील शांताबाई आण्णासो हिंगमिरे या आजींच्या घरची माहिती घेण्यात आली. आजींच्या घरी त्यांची सुन आणि नातू एवढंच तिघांचं कुटुंब आहे. घरात पुरुष कुणीच नाही. स्वतःची शेती सुद्धा काहीच नाही. नातु आता १० वी शिकतोय. अशा परिस्थितीत घर चालवायचं तर ते फक्त एक म्हैशीच्या दुधावर. आणि निसर्गाने सुद्धा तिच म्हैस हिरावून घेतली. अशा परिस्थितीत आजींच्या छोट्या कुटुंबावर खुप मोठं संकट आलं होतं.

या आजींच्याबद्दल माहिती समजताच सौ. प्रिती देसाई, सतिश देसाई, अतुल देसाई आणि त्यांचे कुटुंब त्या आजींना भेटून आले. आजींच्या परिस्थितीची माहिती घेऊन आले. आणि आता या आजींना या संकटातून बाहेर काढायचे ठरवले.
प्रीतिचां रिपोर्ट मिळताच उडान फौंडेशनचे धडाडीचे संस्थापक सदस्य रोहन माने यांनी दुभती म्हैस शोधायची मोहीम हाती घेतली.त्यांच्यासोबत नितीन खामकर, ओंकार अकोळकर आणि काही ज्येष्ठ मंडळींना सोबत घेऊन गेली २-३ आठवड्यापासून म्हैस शोधायला चालू होतं.
त्यांच्या प्रयत्नांना सुद्धा यश मिळाले. कुडीत्रे गावातील बाजारात पाचगाव मधील शेतकऱ्याची घरगुती, मस्त आणि दुभती असणारी सर्वोत्तम म्हैस मिळाली. रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी म्हैशीची शिंगे रंगवण्यात आली. नविन दोरी, घुंगरू असे सजावटीचे साहित्य घेऊन तिला सजवण्यात आले.
सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा मतदानाचा हक्क बजावून सगळे मिळून राजापूर मधील आजींना म्हैस देण्यासाठी निघाले.दुपारी १-२ च्या दरम्यान राजापूर (कुरुंदवाड पासून १० कि. मी.) गावी पोहोचलो. गावात पोहोचताच सरपंच दानु पाटील आणि सर्व गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले. सर्व गावकऱ्यांनी मिळून म्हैस टेम्पो मधून उतरली. आणि सर्व आल्याचे शांता आजींना निरोप दिला.
आजी अगदी धावत पळत आल्या. त्यांनी म्हैस बघितली आणि त्यांच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं. म्हैशीच्या जवळ गेल्या आणि पाण्यावलेल्या डोळ्यांनी तिच्या डोक्यावर हात फिरवू लागल्या.दाटून आलेला कंठ सावरत त्या पुन्हा घरी गेल्या आणि म्हैशीसाठी चारा घेऊन आल्या. आजीकडे पाहून सर्व गावकरी सुद्धा समाधानी झाले होते. म्हैशीला बघताच गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. अशी म्हैस संपूर्ण गावात कुणाकडे नाहीये असे ऐकताच सर्वाना एक वेगळंच समाधान वाटत होतं.
आजीनं म्हैशीची पुजा केली, तिचे औक्षण केले. आणि डोळ्यात पाणी भरूनच आम्हाला हात जोडून उभी राहिली. त्यावेळी सगळेच भावुक झाले होते. आजींच्या घरी थोडा वेळ थांबून संध्याकाळी ४ वाजता आम्ही तिथून निघालो. आजचा अनुभव अविस्मरणीय होता. सर्वांनी मनापासून केलेली मदत, आणि मनापासून केलेले प्रयत्न यामुळे आज एक यशस्वी आणि अविस्मरणीय उपक्रम पूर्ण झाला. या उपक्रम साठी ज्यांनी ज्यांनी मदत केली, मार्गदर्शन केले त्या सर्वांचे त्यांनीा मनस्वी आभार मानले.या प्रकल्पासाठी
रवींद्र राव, कार्तिक रेड्डी, भुषण सोनवणे, प्रशांत शेट्टी, तुषार आलवा, अतुल देसाई
प्रोजेक्त लीड बॉयअँड मॅनेज बॉय:-
रोहन माने, सौ. प्रिती देसाई, नितीन खामकर, ओंकार अकोळकर, सतिश देसाई
सपोर्ट बॉय शंभूराज पाटील, वृषसेन सदलगेकर, स्मिता पाटील, महेश बिरोजे
या सर्वांच्या सहकार्यातून उडान फौंडेशनचे संस्थापक भूषण लाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अविस्मरणीय अशी सामाजिक बांधिलकी जपली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button