Nandurbar

जिल्ह्यात सोमवारी पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन शेतकऱ्यांनी मेळाव्याचा लाभ घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

जिल्ह्यात सोमवारी पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन
शेतकऱ्यांनी मेळाव्याचा लाभ घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

फहिम शेख

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 21: शेतकऱ्यांना पीक कर्जाचे अर्ज भरण्यास सुलभ व्हावे यासाठी जिल्ह्यात सोमवार 22 जून रोजी 105 बँक शाखांतर्फे विविध गावात पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले आहे.

पालकमंत्र्यांनी नंदुरबार येथे घेतलेल्या आढावा बैठकीत बँक अधिकाऱ्यांशी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्याविषयी चर्चा केली होती. शेतकऱ्यांना पीक कर्ज योजनेची व अर्ज भरण्याची माहिती नसल्याने ते कर्ज घेण्यापासून वंचित रहातात. त्यामुळे मेळाव्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून अर्ज भरून घ्यावे व पीक कर्ज मिळविण्यासाठी अत्यंत सोपी प्रक्रीया असल्याचा संदेश त्यांच्यापर्यंत देण्यात यावा, असे निर्देश ॲड.पाडवी यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार या मेळाव्यांचे आयोजन होत आहे.

पालकमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी राजा संकटाची भिती बाजूला सारून नव्या हंगामासाठी तयारीला लागला आहे. संकटावर मात करण्याची शेतकऱ्याची जणू परंपराच आहे. पण अशा परिस्थितीत खते, बी-बियाणे, अवजारे यासाठी त्याला आर्थिक सहकार्याची आवश्यकता असते. म्हणून शासनातर्फे कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अजूनही कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नाही. बऱ्याचदा माहिती नसल्याने असा लाभ घेणे शक्य होत नाही. अशी माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त बँक शाखांमार्फत येत्या सोमवारी 22 जूनला ग्रामीण भागात पीक कर्ज मेळावे होत आहेत.

पीएम किसान योजनेचे लाभार्थी आणि नव्या कर्ज घेवू इच्छिणाऱ्यांना या मेळाव्यात अर्ज भरण्यासाठी मदत केली जाणार आहे. त्या गावातील आणि इतर परिसरातील गावातील शेतकऱ्यांकडून पीक कर्जासाठी अर्ज भरून घेतले जातील. त्यांना कर्ज प्रक्रीयेची माहिती दिली जाईल. अर्ज भरल्यानंतर त्यांना कर्ज मिळाले की नाही याबाबत प्रशासन बँकांकडे पाठपुरावा करणार आहे. शेतकऱ्यांना सहकार्य करण्याविषयी बँकानादेखील सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्यावर्षी जिल्ह्याने पीक कर्ज वाटपाचे साधारण 40 टक्के उद्दीष्ट गाठले होते. यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज देऊन 80 टक्क्यापेक्षा जास्त उद्दीष्ट गाठण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि कर्जाबाबत काही समस्या असल्यास तलाठी किंवा ग्रामसेवकामार्फत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन ॲड.पाडवी यांनी केले आहे. या उपक्रमाबद्दल त्यांनी प्रशासनाचे अभिनंदनदेखील केले आहे. सर्व बँक शाखांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना धन्यवाद देतांना त्यांनी संवेदनशिलतेने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी आणि हा खरीप हंगाम त्यांच्यासाठी आनंददायी ठरेल असे प्रयत्न करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button