Nandurbar

शहरी भागात सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कडक संचारबंदी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देश

शहरी भागात सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कडक संचारबंदी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देश

फहिम शेख नंदुरबार

नंदुरबार : नाशिक विभागातील इतर जिल्ह्यात आणि नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यातील नंदुरबार,नवापूर, शहादा, तळोदा नगरपालिका क्षेत्रात, अक्राणी नगरपंचायत,अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात 11 मार्च पासून सायंकाळी 7 ते सकाळी 6 या कालावधीत कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, सदर संचारबंदी ग्रामीण भागात लागू राहणार नाही, ग्रामीण भागात यापूर्वी पारीत केलेले आदेश कायम राहतील. संचारबंदी दरम्यान रुग्णालये आणि औषधाची दुकाने, दुध व वृत्तपत्रे वितरण वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहतील. या कालावधीत सार्वजनिक वाहतूक सुविधा सुरू राहील. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यां विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. संचारबंदी कालावधीत बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद राहतील. नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरण्याची मुभा नसेल. मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर पोलीसांनी कडक कारवाई करावी.

नंदुरबार शहरात 10 दिवसात 20 हजार ॲन्टिजन चाचणी करण्यात याव्यात. दुकानदार, लहान व्यावसायिक, विक्रेते, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, कर्मचारी, मजूर, फेरीवाले, एस.टी बसचे वाहक व चालक, रिक्षाचालक, सर्व प्रकारच्या खाजगी व शासकीय प्रवासी वाहतूक, यांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक राहील. चाचणी करण्यास विरोध करणाऱ्यांची आस्थापना बंद करण्यात यावी. ॲन्टीजन चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन तात्काळ करावे.

सिनेमागृह, जीम, व्यायामशाळा, नाट्यमंदिरे, जलतरण तलाव, लग्नासाठीचे हॉल, उद्याने बंद राहतील. सर्व प्रकारच्या धार्मिक सभा, राजकीय सभा,रॅली, मिरवणूका, आंदोलन, मोर्चा, धरणे, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम यावर प्रतिबंध घालण्यात यावेत. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे सकाळी 6 ते सायंकाळी 7 वेळेत सुरु राहील. धार्मिक विधीमध्ये पाच व्यक्तीपेक्षा अधिक व्यक्ती उपस्थिती राहणार नाही. शनिवार व रविवार या दिवशी धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद राहतील. भाजी मंडई सकाळी 6 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु राहील आणि ‘एका आड एक’ याप्रमाणे ओटे सुरु राहतील याची दक्षता स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनाने घ्यावी.

17 मार्चपर्यंतच्या पुर्वनियोजित विवाह समारंभ व इतर समारंभास स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस स्टेशन यांचेकडून परवानगी घेण्याच्या व कोविड-19 च्याबाबतीत सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे अधीन राहून मान्यता देण्यात यावी. आयोजक व मंगल कार्यालय,लॉन्स, हॉल्सचे मालक यांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या अटीवर सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 50 व्यक्तींच्या मर्यादेत समारंभ घेण्यास परवानगी राहील. 18 मार्च पासून लॉन्स, मंगल कार्यालये, हॉल्स या ठिकाणी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करण्यास पुढील आदेशापर्यंत बंदी राहील. कोरोना विषयक मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.

खाजगी कोचिंग क्लास आणि शाळांना अचानक भेट देऊन सुचनांचे पालन होत असल्याबाबत खात्री करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास कोचिंक क्लास मालक व मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करावे. फिरते विक्रेते, दुकान चालक व पेट्रोलपंप चालकांनी ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ असा फलक लावणे आवश्यक आहे. मास्क नसलेल्या ग्राहकाला वस्तू किंवा सेवा देऊ नये.

शासकीय कार्यालयात मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण 90 टक्क्यापेक्षा अधिक होईल यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button