माणुसकी अजूनही जिवंत आहे…
सुभाष भोसले-कोल्हापूर
सकाळी ८:३० वाजता कोल्हापूर मधील अश्विनी पाटोळे यांचा उडान फौंडेशनच्या रोहन माने कॉल आला. दारामध्ये एक आजोबा आले आहेत. मला भुक लागली आहे, काहीतरी खायला द्या असं हिंदी मधून ते सर्वाना सांगत आहेत. आता आम्ही त्यांना खायला दिलेय. पण त्याचं पुढे काय होईल? आणि त्यांच्यासाठी काय करता येईल, नाहीतर ते असेच फिरत राहणार याचा विचार करत त्यांना घराजवळच बसवून ठेवलं. पुढे काय करायचं हे समजत नव्हतं. पण उडान फौंडेशनबद्दल ऐकलं होतं. तेच आता या आजोबांच्या मदतीला येऊ शकतात.म्हणून उडान फौंडेशनमधील रोहन माने यांना कॉल केला.
त्यावेळी अश्विनी ना सांगितले की आजोबांच्याकडून काही माहिती मिळते का पहा. पण आजोबांनी काहीच माहिती सांगितली नाही.
संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडल्यावर ६ वाजता तेआजोबांना शोधण्यासाठी शिवाजी पेठ, कोल्हापूर मध्ये गेले आजोबांना शोधत असतानाच महाराष्ट्र हायस्कुलच्या गेटवर गेल्यावर अंधारात एक व्यक्ती दिसली. जवळ जाऊन बघितलं असता हे तेच आजोबा आहेत याची खात्री पटली.
ते आजोबा महाराष्ट्र हायस्कुलच्या गेटवर स्वच्छता करत होते. हातामध्ये एक वीट घेतली होती आणि लहान लहान खडे ते बाजूला सरकत होते. त्यांच्याशी बोलण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते मानसिक रुग्ण असल्याचे जाणवले. त्यांच्या उजव्या हातावर रिंकू असे नाव लिहिले आहे. हिंदी मधुनच ते बोलतात. त्यांचे नाव विचारले तर त्यांनी हसत हसत उत्तर दिले की मेरे तो बहुत नाम हे..! हे ऐकून सुद्धा वेगळं वाटलं. पण त्यांनी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं. कुणी त्यांना कुमार म्हणतात, कुणी त्यांना प्रकाश म्हणतात, तर कुणी त्यांच्या हातावरील नाव पाहून रिंकू असेच नाव देतात. म्हणून मग त्यांना असे विचारले की तुमचे आई-वडील तुम्हाला काय म्हणायचे तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रकाश म्हणायचे. वडिलांचे नाव अमरसिंह असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर आणि डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खालील बाजूस एक जखम असल्याचे दिसून आले.
त्यांना चहा-टोस्ट खाण्याची जास्त आवड आहे. म्हणून त्यांना चहा आणि टोस्ट खायला* दिले. त्यांना केस आणि दाढी कटींग साठी घेऊन जायचं होतं. तिथे आसपास असलेल्या बऱ्याच जेन्ट्स पार्लर मध्ये विचारलं पण त्या आजोबांच्या अंगावरील खराब कपड्यामुळे त्यांचे केस कटींग करायला कुणीही तयार होत नव्हते. तेव्हा अश्विनी पाटोळे पुन्हा कॉल केला आणि एक जुना ड्रेस असेल तर आजोबांच्या साठी घेऊन यायला सांगितले. पण त्या मात्र नवीन ड्रेस घेऊन आल्या.
आजोबांना कपडे बदलायला सांगितले. कपडे बदलून होई पर्यंत उडान फौंडेशनच्या पुजा कांबळे यांनी लगेच मेडिकल मध्ये जाऊन प्रथमोपचार साहित्य आणले. आजोबा कपडे बदलून आल्यावर पुजाने त्या जखमा क्लीन करून त्यांना औषध-मलम लावले. नंतर आजोबांना बाईकवर घेऊन सी. पी. आर. च्या दिशेने गेले.
त्यांच्या सोबत बराच वेळ राहिल्याने त्यांनी आता चांगलीच ओळख केली होती. त्यांच्या आवडीची गाणी म्हणत, त्यांना गाणी म्हणायला साथ देत सर्व सोन्या मारुती चौकात पोहोचलो. तिथे असलेल्या पार्लर मध्ये आम्ही विनंती केल्यावर त्यांनी केस आणि दाढी कटींग करण्याची तयारी दर्शवली. दाढी आणि केस कटींग केल्यावर आजोबांना घेऊन ते पुन्हा सी. पी. आर.मध्ये आले.
सी. पी. आर. मध्ये आजोबांची प्राथमिक तपासणी केली. त्यांना औषधे घेतली. आणि पोलिस ठाण्यात त्यांची नोंद केली. रात्री ११:३० वाजता कोल्हापूर महानगरपालिका आणि अवनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू टोल नाका, विद्यापीठ रोड, कोल्हापूर येथे सुरु असलेल्या रात्र निवारा केंद्रात आजोबांना दाखल करण्यात आले. त्यांना पोटभर जेवायला देऊनच आम्ही तिथून बाहेर पडलो
एक महत्वाची गोष्ट म्हणजे,
आज अश्विनी पाटोळे आणि त्यांच्या कुटुंबाने विचार केला की, आपण आता आजोबांना खायला दिलेय. त्यांची आत्ताची व्यवस्था झाली. पण पुढचं काय? यासाठी काहीतरी केलं पाहिजे. असा विचार येताच उडान फौंडेशन आजोबांच्यासाठी काहीतरी नक्की करेल, त्यांच्या भविष्याचा प्रश्न सोडवेल याची खात्री होती. म्हणून त्यांनी उडान फौंडेशनला संपर्क केला…
एका निराधार बेघर व्यक्तीच्या भविष्याचा विचार करून उडान फौंडेशनला संपर्क करणाऱ्या संवेदनशील अश्विनी पाटोळे आणि त्यांच्या कुटुंबियांना सलाम…
आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की सर्वांनी मिळून जर असा विचार केला तर १ दिवस असा येईल की कोल्हापूर मध्ये एकही बेघर व्यक्ती मिळणार नाही.
आपल्या दारात, आजुबाजुला जर असे कुणीही बेघर आढळून आल्यास त्यांना हाकलून न देता, माणुसकीच्या नात्याने खायला देऊन, त्यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांची माहिती मिळते का पहा आणि लगेच उडान फौंडेशनला संपर्क करा.असे भावनीक आवाहन संस्थापक भूषण लाड यांनी केले.






