घरगुती वादातून आईने दोन लेकींना पाजलं विष
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे घरगुती वादातून आईने दोन मुलींना विष पाजून स्वत: विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. यात आई व एका मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या मुलीवर उपचार सुरू आहेत.
पळसवाडी येथील जनाबाई मंदाडे या विवाहीतेने राधाबाई आढाव (३५, विवाहित) व हिराबाई मंदाडे (४०, अविवाहीत) या मुलींना आज सकाळी साडेसहा वाजता पळसवाडी शिवारातील आपल्या शेतात नेऊन घरगुती कारणाने दोन्ही मुलींना विष पाजून स्वत: विषप्राशन केले.
विषप्राशन केल्यानंतर सदरील तिन्ही महिला बेशुध्द अवस्थेत पडलेल्या गावातील व्यक्तीच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ माहिती ग्रामस्थ व पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता जनाबाई मंदाडे व राधाबाई मनोज आढाव यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे दिसून आले. तर हिराबाई आन्ना मंदाडे हालचाल करीत असल्याने त्यांना वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.






