Dhule

?भूखंडाच्या विषयावरून नगररचना ‘ चे काढले वाभाडे,’ वकिलां ‘ वरही संशय

भूखंडाच्या विषयावरून नगररचना ‘ चे काढले वाभाडे,’ वकिलां ‘ वरही संशय

धुळे : बांधकाम परवानगीसह महापालिका क्षेत्रातील भूखंडांच्या अनुषंगाने होणारी प्रशासकीय प्रक्रिया, न्यायप्रविष्ट बाबींवर गांभीर्याचा अभाव आदी विविध मुद्यांवर आरोप करत नगरसेवकांनी महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले.
महापालिका भूखंडाच्या अनुषंगाने न्यायालयात बाजू मांडणाऱ्या महापालिका पॅनलवरील वकिलांच्या कार्यपद्धती व क्षमतेवरही काही नगरसेवकांनी संशय व्यक्त केला. त्यामुळे अशा संशयास्पद कार्यपद्धती असणाऱ्या अकार्यक्षम वकिलांना बदलण्याचा आदेशच महापौर चंद्रकांत सोनार यांनी महासभेत दिला.
महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी अकराला ऑनलाइन झाली.
महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, नगरसचिव मनोज वाघ, काही सदस्य ऑनलाइन, तर काही सदस्य प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित होते.
विषयांवरून गदारोळ
सुरवातीलाच विरोधी पक्षनेते साबीर शेठ यांनी स्वच्छता, पाणीप्रश्‍न मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ताधारी भाजपचे नगरसेवक शीतल नवले, संजय पाटील, प्रदीप कर्पे यांनी त्यास आक्षेप घेत अजेंड्यावरील विषयांवर प्रथम चर्चा करण्याची मागणी केली. यामुळे सभागृहात दोन गट पडले. हा वाद बराचवेळ चालल्यानंतर अजेंड्यावरील विषयांवर चर्चा करण्याचा निर्णय झाला.
मनपाच कशी हारते?
देवपूर येथील दत्तमंदिर ते स्वामिनारायण मंदिर १५ मीटर रस्त्यासाठी भूसंपादनाचा विषय होता. याविषयावर श्री. नवले यांनी विविध आक्षेप नोंदविले. मुळात सदस्यांपुढे सविस्तर माहिती ठेवली जात नाही. नगररचना विभाग सर्वांत जास्त समस्या असलेला आहे. मनपा जागांची सर्व न्यायप्रविष्ट प्रकरणे महापालिका कशी हरते, असा थेट प्रश्‍नही त्यांनी केला. हाच संदर्भ घेऊन सदस्य हिरामण गवळी यांनी मनपा पॅनलवर कोणते वकील आहेत तेही माहीत नसते, असे सांगितले.
…अन्यथा आत्मदहन करेन
साबीर शेठ यांनी नगररचना विभागातील आरेखक (ट्रेसर) संजय बहाळकर शहराचे भविष्य असल्याची खोचक टिपणी केली. नगररचनाकार महेंद्र परदेशी फाईलवर स्वाक्षरी करू का नको, असे या बहाळकरांना विचारतात, बहाळकर फाइल मंजुरीसाठी ५० हजार मागतो. लेआउटमध्ये नाल्याची नाली व नालीचा नाला करणारी ही मंडळी आहे, असे आरोप केले. बहाळकर यांना निलंबित करा, अन्यथा आत्मदहन करेन, असा इशाराही त्यांनी दिला. श्री. नवले, श्री. गवळी, श्री. पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.
वादग्रस्त भूखंडाचा विषय अखेर रद्द
सर्व्हे नंबर ४८३/अ/२ मधील अर्थात, मालेगाव रोडलगत शंभर फुटी (३०.०) मीटर विकास योजना रस्ता विकसित केला असून, त्याकामी भूसंपादन प्रक्रिया व आर्थिक तरतुदीबाबतच्या वादग्रस्त विषयावरही सदस्यांनी नगररचना विभागाला धारेवर धरले. हा विषय न्यायप्रविष्ट असताना महासभेपुढे आणलाच कसा, किशोर बाफना यांना ब्लॅकलिस्ट करा, संबंधित भूखंडाबाबत बाफनाने की महापालिकेने की गोशाळेने फसविले, याची चौकशी करा, असे विविध मुद्दे सदस्यांनी मांडले. या विषयाला विरोधाचे पत्रही काही नगरसेवकांनी दिले होते. महापौर श्री. सोनार यांनीही याविषयाबाबत अनेक प्रश्‍न आहेत. त्यामुळे प्रशासनाने खुलासा करावा, असे सांगितले. प्रशासनातर्फे नगररचनाकार परदेशी, खुद्द आयुक्त शेख यांनी खुलासा केला व या प्रकरणात न्यायालयातही आपण भक्कमपणे बाजू मांडल्याचे सांगितले. शेवटी हा विषय रद्द करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button