पंढरपूर

पंढरीत लवकरच राष्ट्रवादी महिला सुरक्षा समित्या -सुवर्णा बागल

पंढरीत लवकरच राष्ट्रवादी महिला सुरक्षा समित्या -सुवर्णा बागल

प्रतिनिधी (रफिक आत्तार)

पंढरपूर महिला वर्गाच्या समस्या, त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यात तीन महिला समित्या बनविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव सुवर्णा बागल यांनी दिली. या समित्या बनवण्याबाबत पोलीस निरीक्षकांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ही माहिती दिली. यावेळी ओबीसी सेलच्या महिला जिल्हाध्यक्षा साधना राऊत उपस्थित होत्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या वतीने महिलां वरील अन्याय अत्याचार तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात महीला सुरक्षा समित्या स्थापन केल्या जात आहेत. खा.सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कमिट्या संपूर्ण राज्यात स्थापन केल्या जात आहेत. पंढरपूर तालुक्यात सुवर्णा बागल तसेच ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षा साधना राउत यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात या समित्या स्थापन केल्या जात आहेत.

या संदर्भात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्याशी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले.याच वेळी पोलीस निरीक्षक गावडे यांनी या समित्यांना प्रसंगी प्रशिक्षणही देण्यात येईल असे सांगितले.

याबाबत माहिती देताना सुवर्णा बागल यांनी सांगितले की, पंढरपूर शहरात दहा महिलांची एक समिती याप्रमाणे तीन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. यातील महिला सदस्य त्या त्या परिसरातील महिलांच्या अडी-अडचणी, यांच्यावरील अन्याय, अत्याचार तसेच वेगवेगळ्या समस्या याबाबत त्यांना मार्गदर्शन करतील. तसेच त्यांच्या तक्रारींचा पाठपुरावा करतील. यामुळे महिला वर्गात निर्भयतेचे वातावरण तयार होईल. या समित्या स्थापन करण्यामागे राष्ट्रवादी पक्षाचा हाच उद्देश असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी त्यांचे सोबत राष्ट्रवादीच्या ओबीसी महिला कार्याध्यक्ष रंजना हजारे ,कांचन खंडागळे, शोभा ननवरे, तालुकाध्यक्ष गंगा पवार, शहराध्यक्षा पुजा कोळी, प्राजक्ता पवार ,चारुशीला कुलकर्णी ,शुभांगी जाधव, संगीता शिनगारे आणि वर्षा कुलकर्णी आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button