शहरातील पाणीप्रश्नावर मनसे आक्रमक, मनपा आयुक्तांना दिला इशारा
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : मागील अनेक महिन्यांपासून मनपातर्फे शहरवासीयांना करण्यात येणा-या पाणी पुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. शहरात आठ दिवसा आड पाणी पुरवठा होत असल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
शहराचा पाणीप्रश्न येत्या 10 दिवसांत न सोडवल्यास मनपा आयुक्तांच्या घराच्या नळाचे कनेक्शन कापणार असल्याचा इशारा मनसेने बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
दोन दिवसांपूर्वी मनसेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांची भेट घेऊन शहरातील पाणी प्रश्न गंभीर होत असून नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने लवकरात लवकर पाणीप्रश्न सोडवावा, असे निवेदन दिले होते. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन मनपा आयुक्तांना 10 दिवसात शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मनसे जिल्हा संघटक बिपीन नाईक, जिल्हा संघटक वैभव मिटकर, उपशहराध्यक्ष राहुल पाटिल, मनविसे मा.जिल्हाध्यक्ष संकेत शेटे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत दहिवाडकर, उमेश काळे, प्रशांत आटोळे आदी उपस्थित होते.






