कृषी उत्पन्न बाजार समितीत 30 हजार क्विंटल ची विक्रमी आवक… शिस्त आणि नियम पाळत योग्य नियोजन
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर
शहरात सध्या कोरोना च्या प्रादुभाव आणि संचरबंदी च्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार जवळपास बंद आहेत.परन्तु शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि संचालक यांनी दोन दिवसांच्या सुट्टीनंतर मंगळवारी बाजार समिती धान्य विक्रीसाठी खुली केली.
या मुळे १८०० वाहने जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्याातील विविध गावांमधून आलेली होती. यातून सुमारे ३० हजार क्विंटलची विक्रमी आवक झाली.
सकाळ पासून बाजार समितीबाहेर दोन कि.मी.ची रांग थेट पैलाड भागापर्यंत लागली होती, तर बालेमिया ते सुभाष चौक वेगळी रांग लावण्यात आली. सकाळी लवकर नऊपासून टप्प्याटप्प्याने ५० वाहनांचा लिलाव करण्यात आला.या सर्वात वाहतूक नियम पाळल्याने वाहतुकीची कोंडी न होता सुरळीतपणे वाहने बाजार समितीच्या आवारात पोहचली.
अमळनेर बाजार समितीत अनेक वर्षांपासून चालणारी कटती बंद करण्यात आली आहे.त्यामुळे रोखीने पेमेंट मिळते या अनुषंगाने जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध तालुक्यातून शेतकऱ्यांनी गहू , दादर, हरभरा, मका, बाजरी विक्रीस आणली होती.
कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यात आले. रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती परन्तु सकाळी सातपासून सभापती प्रफुल पाटील, विश्वास पाटील, भगवान कोळी, हरी वाणी, शंकर बितराई व इतर स्वत: गेटवर थांबून एका वाहनासोबत चालकाव्यतिरिक्त एकाच शेतकरयाला प्रवेश देत होते. गर्दी करणाऱ्यांना हटकत होते. बाजार समिती आवार फुल झाल्यानंतर वाहने टोकन देऊन शेतकी संघ जिनमध्ये उभे राहण्यासाठी सोय करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विविध ठिकाणी हात धुवायला साबण व पाण्याच्या बादल्या, सॅनिटायझर उपलब्ध होते.
कोरोनाची भीती आणि लॉकडाऊननंतर देखील कृषी उत्पन्न बाजार समितीत ३० हजार क्विंटल मालाची आवक झाली. गव्हाला कमाल रुपये २,०५६, हरभरयाला कमाल ३,८५०, दादरला कमाल ४,०००, मक्याला कमाल १,४२१ व बाजरीला रुपये कमाल २,३५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.त्यामुळे शेतकरी खुश होते.
अनेक वाहनांसोबत तीन ते चार व्यक्ती असतातच पण फक्त दोनच लोकांना बाजार समितीत प्रवेश प्रवेश देण्यात आला. बाजार समितीत कोरोनासंदर्भात योग्य ती काळजी घेतली जात होती.सतत अनौन्सिंग करून आवाहन केले जात होते.






