आश्रमशाळेत सुनियोजीत पद्धतीने लसीकरण पार पडले
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळा व राजमाता अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालय या विभागातील इ.९ ते इ.१२वी.च्या १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे (दि.६) लसीकरण यशस्वीरित्या झाले.
प्राथमिक आरोग्य केंद्र पळसदेव व उपकेंद्र गलांडवाडी नं.२ यांच्या संयुक्त विद्यमाने पळसदेव केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. इशा बंगेरा यांच्या नेतृत्वाखाली C.H.O. डॉ. प्रिया गजाकोश, आरोग्यसेविका सौ. श्रद्धा पाचणकर,आरोग्यसेवक श्री. तानाजी कांबळे, आशासेविका सौ. जयश्री गलांडे यांनी संस्थेतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. अशी माहिती प्राचार्या अनिता साळवे यांनी पत्रकारांना दिली.
साळवे पुढे म्हणाल्या की, अलीकडच्या काळात काही दिवसात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होत असून नुकतेच १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोवीड लस देण्याचे शासनाने निर्देश दिले असून त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यार्थ्यांचे लसीकरण पार पडले.
लसीकरणावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, कुतूहल आणि धाकधूक देखील दिसून आली. तत्पूर्वी लसीकरणाबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्यात असलेली संभ्रमावस्था दूर करूनच विद्यार्थ्यांचे लसीकरण केले. विद्यालयात लसीकरण चोख नियोजनात पार पडले. त्याकरता प्रशस्त वर्ग खोल्या, नोंदणीसाठी वेगळा कक्ष, लसीकरणासाठी वेगळी वर्गखोली, लसीकरणानंतर विद्यार्थ्यांना विश्रांतीसाठी स्वतंत्र वर्गखोल्यांची व्यवस्था केली होती. लसीकरणानंतर मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालातर आरोग्य विभागाच्या वतीने तज्ञांची उपलब्धता केली होती.
पहिली लस आज मिळाली, २८ दिवसानंतर दुसरी मात्रा मिळेल. त्यामुळे परीक्षेला बसण्याचे टेन्शन थोडे हलके होईल,अशी प्रतिक्रिया सृष्टी लोखंडे या विद्यार्थिनी दिली.
शाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण केल्यामुळे स्वतःला व इतरांनाही संसर्गापासून संरक्षण मिळेल, त्यामुळे शिक्षक व पालकवर्गाची चिंता मिटेल. विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करतील अशी अपेक्षा संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे यांनी केली.
यावेळी प्राचार्या अनिता साळवे यांनी आरोग्य विभागाच्या टीमचे आभार मानले.






