?️अमळनेर कट्टा…आज अधिकाऱ्यांची एकाच ठिकाणी “चमकोगिरी” करत “गर्दी” हटविण्यासाठी “गर्दी”…! स्वतःच मोडले नियम यांना कोण दंड करणार..?नियोजन शून्य व्यवस्थापन…!
अमळनेर कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला विचारात घेता संपूर्ण महाराष्ट्रात दि 23 मार्च 2020 पासून आपत्ती व्यवस्थापन नियमावली लागू करण्यात आली आहे.दि 1 जून पर्यंत संचारबंदी आणि रात्रीचा कर्फ्यु निर्बंध लागू असून गेल्या 1 महिन्यात या सर्व नियमांना प्रशासनाने धाब्यावर बसवून ठेवले होते. या संदर्भात ठोस प्रहार ने ही कसली संचारबंदी ही तर संचारसंधी ह्या मथळ्याखाली बातमी देखील प्रकाशित केली होती.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी परवा घेतलेल्या पत्रकार परिषदेत कडक निर्बंधांची घोषणा केली आणि झोपलेल्या अमळनेर प्रशासनाला खडबडून जाग आली.आणि आज अमळनेर चे प्रशासन चमकोगिरी करत एकाच ठिकाणी सर्व अधिकारी गर्दी हटविण्यासाठी गर्दी करून उभे राहिले.. आता सांगा लोकांना गर्दी करून तुम्ही हटविणार तर ते काय आदर्श घेतील बर अधिकाऱ्यांकडून..!एकूणच नियोजन शून्य असा कारभार अमळनेर प्रशासनाचा सुरू असून जनतेला यांच्या कार्याची पध्दत आणि सखोलता माहीत असल्या कारणाने अमळनेर प्रशासनाचे कुणीही ऐकत नाही असा प्रकार घडत आहे.आज 11 वाजून 30 मिनिटांनी सर्व अधिकारी ऐटीत महाराणा प्रताप चौकात एकाच ठिकाणी गर्दी करून उभे होते.. त्यांनी केलेल्या ह्या नियम भंगाची शिक्षा किंवा दंड त्यांना कुणी करावा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.. त्यांना नियम लागू नाहीत का? शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना कोणी दंड करावा? लोक काय आदर्श घेतील? कोरोना आपत्ती व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष उपविभागीय अधिकारी यांनी नियोजन करून प्रत्येक चौकात एक अधिकारी, कर्मचारी असे विभागून सर्व ठिकाणची गर्दी आटोक्यात आणता आली असती..पण नाही चमकोगिरी करायला हवी आहे ना..!अर्धा तास फोटो सेशन झाल्या नंतर संपूर्ण गावात लोकांचे येणे जाणे सुरू होते.रस्त्यांवर गर्दी होतीच..पोलीस बंदोबस्त कुठेच नंतर दिसून आला नाही. भाजी वाल्यांना काठीने बेदम मारहाण केल्या नंतर कुठेच बंदोबस्त आढळून आला नाही.. फक्त उपविभागीय पोलीस अधीक्षक राकेश जाधव मात्र आपल्या पथकासह “भाजी बाजारात” गस्त घालत असल्याचे दिसून आले.
अमळनेर प्रशासनाच्या दृष्टीने कोरोना हा फक्त बाजार पट्ट्यात होणाऱ्या गर्दी मुळेच पसरतो..ही एक अंधश्रद्धा अमळनेर च्या कोरोना आपत्ती व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष आणि अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आणि न प कर्मचारी यांनी पाळून ठेवली आहे.त्यामुळे तिथेच फक्त कार्यवाहीचा बडगा उचलला जातो.आज कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठया प्रमाणात गर्दी होती. त्या बाहेर असलेल्या शिव भोजन थाळी केंद्रावर प्रचंड गर्दी होती व व्यक्तिगत वडा पाव व भजी विक्रीचा उच्चांक गाठला होता.तर तहसील कार्यालयाच्या बाहेरच असलेल्या चहा च्या टपरीवर विनाकारण लोकांनी गर्दी केली होती. तिथे प्रशासनाचे दुर्लक्ष होते.इथे पोलीस देखील उभे होते. पण कार्यवाही करण्यात आली नाही. याशिवाय बँक ऑफ बडोदा,कृषी उत्पन्न बाजार समितीतील सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक,स्टेट बँक चे इ ग्राहक सेवा केंद्र इ ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. सर्व कोव्हीड 19 नियम धाब्यावर बसवून हे सर्व सुरू असताना अमळनेर प्रशासनाचे लक्ष मात्र फक्त बाजारावरच केंद्रित असलेले दिसून आले. हा विषय संपूर्ण कोव्हीड 19 काळातील असून सर्व नियम फक्त बाजार भागातच लागू करण्यात आले आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक आस्थापना नियमांचे उल्लंघन करत सुरू असून प्रशासनाने मोठ्या दुकानदारांच्या संदर्भात डोळ्यावर पट्टी बांधली आहे असे एकूण चित्र अमळनेर परिसरात दिसून येत आहे.






