इंदापूर येथे कुरेशी गल्लीतील कत्तलखान्यावर पोलीसांचा छापा 3 लाख 62 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
दत्ता पारेकर पुणे
पुणे : इंदापूर शहरातील कुरेशी गल्लीतील कत्तलखान्यावर पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात कत्तलीसाठी आणलेल्या लहान 63 वासरांची सुटका करत एक म्हशीचे रेडकू, एक पिक अप वाहन व वासरांचे 50 किलो अर्धवट कापलेले मांस असा 3 लाख 62 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी अजीम मुनीर कुरेशी, जमीर कुरेशी, रशीद बेपारी (सर्व रा. कुरेशी गल्ली, इंदापूर), बंडू दगडू जाधव (रा.रामोशी गल्ली, इंदापूर) जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयाने त्यांना बुधवार (दि. 24) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलीस हवालदार शंकर मरीबा वाघमारे यांनी फिर्याद दिली असून याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, इंदापूर शहरातील कसाबगल्लीतील कत्तलखान्यात लहान वासरांना कत्तलीसाठी आणले असल्याची गोपणीय माहिती इंदापूर पोलिसांना मिळाली. लागलीच पोलीसांच्या पथकाने तेथे धाड टाकून 61 हजार रुपये किंमतीच्या काळे पांढरे रंगाची 61 जर्शी गायीची नर जातीची एक आठवडा वयाची लहान वासरे, एक हजार रुपये किंमतीचे नर जातीचे म्हशीचे रेडकू व 3 लाख रुपये किंमतीचे पांढ-या रंगाचे पिकअप (क्रमांक- एम एच 42 एम 6409) वाहन तसेच जर्शी गायीच्या वासराचे अर्धवट कापलेले 50 किलोचे मांस असा एकून 3 लाख 62 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीस पथकाने हस्तगत केला.
आरोपींनी बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल केलेली व जिवंत 63 गायीच्या जातीची लहाण वासरे, एक म्हशीचे जातीचे लहान रेडकू यांना चारा, पाणी न देता क्रुरतेने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेल्या स्थितीत आढळून आले अशा फिर्यादीवरुन आरोपींवर भादवि कलम 429 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1960 चे कलम 5 (अ),(ब),(क)9 व पशु क्रूरता अधिनियम 1960 चे कलम 11 प्रमाणे इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. बी. जाधव करीत आहेत.






