जळगाव जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार थांबवून दोषींवर कडक कार्यवाही करा…. डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेने निवेदनाद्वारे केली मागणी…
रजनीकांत पाटील
अमळनेर :-
अमळनेरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद तर्फे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना अमळनेर प्रांताधिकारी यांच्याद्वारे जळगावं जिल्हा रुग्णालयाच्या कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभार थांबवून दोषींवर कडक कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात, जळगांव जिल्ह्यातील कोरोना रुणांचा वाढता आलेख थांबत नाही. तसेच जिल्ह्यातील प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पावले उचलताना सुद्धा दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याऐवजी मृत्युमुखी पडत आहे. देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण हे जळगावचे सर्वाधिक आहेत. जळगांव जिल्हा रुग्णालयात सोयी-सुविधांची कमतरता आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. उदा. जिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णाचे तब्बल ८० अहवाल गायब होणे, कोरोना पोझीटीव्ह रुग्ण हरवल्याची नातेवाइकांची पोलिसात तक्रार दाखल होणे, उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन वेळेवर न मिळणे, नातेवाईकाना रुग्णाच्या जवळच राहण्याची सक्ती करणे तसेच मृत रुग्णाला किट घालण्यास नातेवाइकांना सांगणे. मात्र हे करत असतांना कोणत्याच प्रकारचे सुरक्षा साधन न पुरवणे, असे प्रकार सर्रासपणे होताना दिसत आहे. रुग्णाची योग्य प्रकारे काळजी न घेतल्याने रुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नातेवाईकासह सर्वसामान्य लोकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. सरकारने या वर गंभीरपणे विचार करावा व दोषींवर कडक कार्यवाही करावी अशी भावना व्यक्त होतांना दिसत आहे. तसेच सिव्हिल हॉस्पिटल जळगावच्या भोंगळ व दुर्लक्षामुळे ऑक्सिजन बंद ठेवल्याने दि ८ जून रोजी अमळनेर येथील रात्री रविंद्र ओंकार बिऱ्हाडे या कोरोना संशयित रुग्णाचा रात्री 1 वाजता मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकानीं केला असून दोषींवर त्वरित कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी ही अमळनेरातील कामगार नेते तसेच इतर दोन रुग्णांच्या मृत्यूला जिल्हा रुग्णालयातील प्रशासनच जबाबदार असल्याचे संबंधित व्यक्तीचे नातेवाईक आरोप करीत आहे.
तरी वरील बाबी लक्षात घेऊन तात्काळ चौकशी करून दोषी असलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करून रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा सरकार विरोधात रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची राहील याची नोंद घ्यावी. अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनावर परिषदेचे कार्यध्यक्ष प्रा विजय वाघमारे, प्रा. हर्षवर्धन जाधव, नगरसेवक नरेंद्र संदांनशीव, प्रा. राहूल निकम, प्रा. विजय गाढे, प्रा. भुसनर, प्रा. सुनिल वाघमारे, सोमचंद संदांनशीव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.






