पंढरपूर

स्वेरीत शास्त्रोक्त व सुयोग्य स्टील बांधणी या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

स्वेरीत शास्त्रोक्त व सुयोग्य स्टील बांधणी या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

रफिक अतार

पंढरपूर- अल्ट्राटेक सिमेंट व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग गोपाळपूर (ता.पंढरपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम क्षेत्रातील सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर यांना ‘शास्त्रोक्त व सुयोग्य पद्धतीने स्टील बांधणी’ या विषयावर स्वेरीमध्ये एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.

बांधकाम क्षेत्रातील महत्वपूर्ण घटक ‘सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर’ हा असतो जो की, सिव्हील इंजिनिअरने डिझाईन केलेल्या कामास अस्तित्वास आणतो. त्यामुळे त्याना शास्त्रोक्त प्रशिक्षण देणे गरजेचे असते.याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून स्वेरीच्या स्थापत्य विभागाने सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर व विभागातील विद्यार्थ्यांकरीता शास्त्रोक्त व सुयोग्य स्टील बांधणी या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये आर.सी.सी. कन्सल्टंट अभियंता केदार बारसवडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्तविक अल्ट्राटेक सिमेंटचे तांत्रिक सेवा व्यवस्थापक बाळकृष्ण कुलकर्णी यांनी केले. यावेळी अभियंता बारसवडे यांनी आपल्या मार्गदर्शनात शास्त्रोक्त पद्धतीने स्टील बांधणी कशी असावी, स्टीलचे एकमेकांवरील सामाईक आच्छादन (लॅप) किती व कसा असावा, दोन रींग बांधणीमधील अंतर नेमके किती असावे, भारतीय मानांकनानुसार कॉलम व बीम यांच्यातील रुंदी कशी असावी, एखाद्या इमारतीचे बांधकाम नियोजनबद्ध व साखळी पद्धतीने कसे करावे तसेच या साखळीतील आर्किटेक्ट, डिझाईनर, इंजिनिअर व सेंट्रिंग कंत्राटदार यांची बांधकामामध्ये नेमकी भूमिका काय हे सविस्तरपणे सांगितले.

सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांनी ही कार्यशाळा बांधकाम क्षेत्रासाठी किती महत्वपूर्ण आहे हे सांगून सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर व उपस्थित बांधकाम व्यवसायिकांना भक्कम बांधकाम व त्याचे महत्व पटवून सांगितले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात सिव्हील इंजिनिअरींगचे महत्व अनन्य असल्याचे सांगून स्वेरी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामात आलेला अनुभव सांगितला. संस्थापक जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी त्यांच्या शासकीय विभागातील कार्य पद्धतीचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला.

उपस्थित सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर यांनी ‘या कार्यशाळेत विविध नवीन गोष्टी शिकल्याने त्यांना त्यांच्या कामात गुणवत्ता वाढविण्यास मदत होईल.’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच स्वेरीने अशा कार्यशाळा वेळोवेळी आयोजित कराव्यात ही भावनाही व्यक्त केली. यावेळी अल्ट्राटेक सिमेंटचे राजेश कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायिक व सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेला स्वेरीचे प्रा. चेतन लिमकर, प्रा. अविनाश कोकरे यांच्यासह इतर प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन प्रा. अमित वाले यांनी केले तर आभार प्रा. श्रीकृष्ण गोसावी यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button