?️ अमळनेर कट्टा…प्रेरणादायी…बूट पॉलिश करत उपशिक्षक ते प्रोफेसर पदापर्यंत यशस्वी वाटचाल…!डॉ दत्तात्रय वाघ सर मानाचा मुजरा..!
जीवनात ध्येय, प्रचंड इच्छाशक्ती आणि खडतर परिश्रम घेण्याची तयारी असली की कोणतीच गोष्ट अशक्य नसते ही बाब सिद्ध करणार व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. डॉ. डी.एन. वाघ होत. खानदेश शिक्षण मंडळाच्या अमळनेर येथील प्रताप
महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय वाघ यांचा प्रोफेसर पदापर्यंत चा प्रवास मोठा खडतर आणि तेवढाच प्रेरणादायी आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील निमोन या छोट्याशा गावात अतिशय हलाखीची आर्थिक स्थिती असलेल्या
सामान्य कुटुंबात । दत्तात्रय वाघ यांचा जन्म झाला. त्यांच्या प्राथमिक शिक्षणापासूनच परिस्थितीचे चटके त्यांना सहन करावे लागले .शिक्षण घेण्यासाठी खडतर मार्गक्रमण सुरू झाले. लोकांचे बूट पॉलिश करणे, कपड्यांचे काज बटन करणे म्हणजेच मिळेल ते काम करून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशात वह्या ,पुस्तके शाळेची फी भरून त्यांच्या शिक्षणाचा जीवघेणा प्रवास सुरू झाला. मनात शिक्षण घेण्याची तीव्र महत्वकांक्षा होती. मनात उद्दिष्ट असले की मार्ग सापडतो त्यासाठी फक्त जिद्द आणि चिकाटी असावी लागते आणि त्याच जोरावर न डगमगता डॉ वाघ यांनी आपला शिक्षण प्रवास सुरू ठेवला. प्रचंड परिश्रम आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर शिक्षण क्षेत्रातील अतिउच्च समजली जाणारी विद्यावाचस्पती ही पदवी त्यांनी संपादन केली.
ही थक्क करणारी त्यांची संघर्ष कहाणी भावी काळात तरुणाईला आत्मशोध घेण्यास प्रवृत्त करेल यात शंका नाही. जीवनात अपयशाचे, निराशेचे अनेक कटू प्रसंग येतात यश पाहता पाहता हुलकावणी देते .काही माणसे प्राप्त परिस्थितीचा बाऊ न
करता परिस्थितीवर विजय मिळवून न खचता, न डगमगता खंबीर पणाने यशाचा आणि ध्येयाचा पाठलाग करतात आणि यश खेचून आणत ध्येयाप्रत पोहोचतात याचे ठळक उदाहरण म्हणजे डॉ वाघ होत. त्यांना मुळात शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात
काम करण्याची तीव्र इच्छा होती… महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची आर्थिक स्थिती नव्हती म्हणून शिक्षण क्षेत्रातील पदविका म्हणजे डी एड करून सन 1982 मध्ये उपशिक्षक म्हणून नोकरी-व्यवसायात त्यांनी सुरुवात केली नोकरी करून पुढील शिक्षण करण्याचा उद्देश त्यांचा होता. त्यांनी संगमनेर येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या शाळेत सात वर्ष उपशिक्षक म्हणून काम पाहिले आणि येथूनच त्यांची प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाशी नाळ जोडली गेली. ती आजतागायत टिकून आहे . महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे अर्थात बालभारती साठी पाचवी व आठवी वर्गाच्या इतिहास विषयाच्या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. त्यांची 1989 मध्ये प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे वरिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता म्हणून नियुक्ती झाली. यानंतर त्यांच्या शिक्षणाचा महामेरू स्वैरपणे मार्गस्थ झाला त्यांच्यापुढे शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या नानाविध लब्ध झा आणि त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. यानंतर त्यांनी कधीच मागे फिरून पाहिले नाही. त्यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे या ठिकाणी निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे या ठिकाणी एम फिल आणि पीएचडी संशोधक मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक या ठिकाणी संशोधन बहिस्थ परीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.
मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम फिल पीएच डी चे प्रबंध परीक्षक म्हणूनही ते काम पाहतात अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते एम. फिल .पीएच डी पदवी पर्यंतच्या ग्रंथांचे परीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. ई. तिसरी ते बारावी सामाजिक शास्त्र अभ्यासक्रम आराखडा समीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले, डॉ.वाघ यांचा गेल्या सतरा वर्षापासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेत सक्रिय सहभाग आहे डॉ वाघ हे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तर अकॅडमिक कौन्सिलचे सदस्य आहेत. स्वायत्त प्रताप महाविद्यालयाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळाचे संचालक तसेच मानसनीती विद्याशाखेचे सदस्य, अकॅडमिक कौन्सिल सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जीव ओतून झोकून देऊन काम करण्याच्या पद्धती मुळे संस्थेच्या संचालक मंडळाने महाविद्यालया
च्या उपप्राचार्य पदाची धुरा तीन वर्ष त्यांच्यावर सोपविली ती त्यांनी समर्थपणे पार पाडली. त्यांनी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आणि परिषदांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला असून त्यांचे आजतागायत नामांकित संशोधन मासिकांमध्ये 40 शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत .त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केलेली आहे .तर दोन विद्यार्थ्यांनी एम. फिल. पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी सहा पुस्तकांचे सहलेखक म्हणून काम पहिले आहे तर त्यांचा संशोधन ग्रंथ ‘ साक्षेपी विचारवंत आचार्य श. द. जावडेकर ‘ हा पुस्तक रुपाने प्रकाशित झालेला आहे. डॉ वाघ हे मुळात प्रसिद्धी आणि नावासाठी काम करणाऱ्यांपैकी नव्हते. मुळात अतिशय गोड, मृदू स्वभावाचे विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणाऱ्या डॉ. वाघांच्या व्यक्तिमत्त्वात गर्व आणि अहंकाराने कधीच प्रवेश केला नाही .प्रसिद्ध झोतात राहणे त्यांच्या स्वभावात कधीच बसले नाही. जेही
काम करायचे ते प्रामाणिकपणे आणि जीव ओतून हा त्यांचा मूळ स्वभाव असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन काम करताना विद्यार्थ्यांना जोम आणि उत्साह येतो. विद्यार्थ्यांच्या पातळीवर जाऊन अध्यापनाचे कौशल्य त्यांच्यात अंगभूत असल्याने यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ अनेक जिज्ञासू विद्यार्थी घेत असतात. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अध्यापन आणि संशोधन कार्याबद्दल सन 2013 मध्ये वारकरी शिक्षण संस्था, आळंदीचे अध्यक्ष ह. भ. प. विठ्ठल महाराज यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले . सन 2017 मध्ये महाराष्ट्र इतिहास महामंडळाच्या वतीने ‘श्री म. कृ. केरूळकर इतिहास शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी, यशासाठी सदैव झटणाऱ्या संशोधन कार्याकडे प्रोत्साहित करणाऱ्या डॉ. वाघ यांचा पद्मश्री अॅड. उज्वल निकम सरकारी वकील, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. जीवनाच्या सारीपाटावर प्रत्येक यश अपयशात खंबीर पणाने साथ देणाऱ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी सौ अरुणा वाघ यांनी सुद्धा आपल्या पतीचा आदर्श घेऊन विवाहानंतर संसार आणि नोकरी व्यवसाय सांभाळून आपले पदवी आणि पदव्युत्तर
शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षिका म्हणून मोलाचे योगदान दिले. डॉ. वाघ यांना दोन सुपुत्र असून मोठा मुलगा आणि सून हे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन भारत सरकारच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक या उच्च पदावर कार्यरत आहेत. तर
लहान मुलगा धुळे येथील सहाय्यक प्राध्यापक म्हणून वडिलांप्रमाणेच ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. स्वतः खडतर परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या डॉ वाघ यांची दोन्ही मुलं उच्चविद्याविभूषित संस्कारक्षम आहेत. आदर्श शिक्षकांप्रमाणे आदर्श पिता म्हणून त्यांची भूमिका अतिशय मोलाची राहिली आहे. त्याचीच दखल घेऊन अमळनेर येथील रोटरी क्लब ने ‘आदर्श पिताश्री म्हणून सन्मान देऊन डॉ वाघ यांचा गौरव केला आहे. डॉ. डी. एन. वाघ सर 31 मे 2021 रोजी नियत वयोमानानुसार प्रोफेसर पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. परंतु त्यांच्या हातून संशोधनाचे आणि संशोधन मार्गदर्शनाचे कार्य असेच अविरत सुरु राहो. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा इतिहास प्रेमींना सदैव होत राहो. त्यांना आरोग्यमय जीवन लाभो या अखिल इतिहास प्रेमी कडून
मनःपूर्वक शुभेच्छा…!
शब्दांकन
डॉ रावसाहेब नेरकर
राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा






