आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तत्पर मदत करा – जिल्हाधिकारी
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : कर्ज, नापिकी, नैराश्य अशा विविध कारणांमुळे आत्महत्यग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शक्य होईल तेवढी मदत वेळेच्या आत मिळावी. यासाठी तालुकास्तरावरील महसूल यंत्रणा व पोलीस यंत्रणा यांच्या समन्वयाने वेळीच गरजू कुटुंबियांना मदत मिळवून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रकल्पाअंतर्गत आयोजित केलेल्या बैठकीत दिले.
या बैठकीस निवासी जिल्हाधिकारी संजीव जाधवर, नोडल अधिकारी तथा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील तहसीलदार व संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एकूण 27 प्रकरणांवर जिल्हास्तरीय समितीने चर्चा करुन यामध्ये 2 प्रकरणांमध्ये नामंजूर आणि 2 प्रकरणांचे फेरतपासणीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला दिले.






