Kolhapur

मंत्री हसन मुश्रीफ यांनी उभारली कोरोना मुक्तीची गुढी

मंत्री हसन मुश्रीफ यांनी उभारली कोरोना मुक्तीची गुढी

कोल्हापूर/कागल प्रतिनिधी–तुकाराम पाटील

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कागल येथील घरासमोर कोरोनामुक्तीची गुढी उभारली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी गुढीचे विधिवत पूजनही केले . ही गुढी कोरोना मुक्तीची असल्याचे सांगताना श्री मुश्रीफ यांनी जनतेला घाबरू नका, आणि खबरदारी व सावधगिरी बाळगा , असे आवाहनही केले. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, गुढीपाडवा म्हणजेच चैत्र प्रतिपदा!
दुष्ट प्रवृत्ती व असुरांचे प्रतीक असलेल्या रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्या नगरीत दाखल झाले .
श्री. रामप्रभू अयोध्या नगरीत येताना स्वागत म्हणून अयोध्यावासीयांनी गुढ्या उभारल्या होत्या, हा इतिहास आहे. गुढीपाडवा म्हणून हाच मंगलमय पवित्र सोहळा आपण मांगल्याच्या वातावरणात साजरा करतो. या सणाच्या आपणा सर्वांना अंतकरणातून शुभेच्छा देताना, या सणावर कोरोनाची दाट छाया आहे, याची हुरहूरही माझ्या मनात आहे.

खरे तर आपण कुणीच कल्पना केली नव्हती, असे महाभयानक संकट साऱ्या जगाच्या दारी येऊन उभे ठाकले आहे..! कोरोना या महाभयानक संकटाच्या रुपाने साऱ्या मानवजातीपुढेच अस्तित्वाचे आव्हान उभे आहे. म्हणून आज गुढीपाडवा या आपल्या संस्कृतीच्या पहिल्याच सणाच्या शुभेच्छा देताना मी म्हणेन की आज कोरोना मुक्तीची गुढी उभारण्याची वेळ आली आहे.

हा सण प्रत्येक भारतीयाचे व त्यातही प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचे जणू आनंदपर्वच असते. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यश, आरोग्य, समाधान, सौख्य याची गुढी उभारावी, अशी मी ईशवरकडे प्रार्थना करून आपणास अनंत शुभेच्छा देत आहे.

प्रत्येक वेळचा गुढीपाडवा व यावेळचा पाडवा यात खूप फरक आहे. माझ्या बंधू -भगिनींनो आणि मित्रांनो! महापुराचे संकट आपण जिद्दीने पेललो व आता हे कोरोनाचे संकट आपल्या पुढे आहे. याने घाबरून जाऊ नका, असे म्हणतानाच आपण कुणीही याबाबत बेफिकीर राहू नये, असेही मला सांगायचे आहे. येणारे काही दिवस अजिबात घराच्या बाहेर पडू नका. सरकार म्हणून आम्ही व प्रशासन दक्ष राहून काम करीत आहोत. तरीही, यातील सर्व काही तुमच्यावरच अवलंबून आहे. तुम्हीच अगदी मनावर घेऊन जर संपर्क, गर्दी, फिरणे, टाळले तर कोरोनाचे संकट परतवून लावणे शक्य आहे.

कोणत्याही कारणासाठी गर्दी करू नका. आपले कुटुंब प्रत्येकाने सांभाळा असे आवाहन या वेळी त्यानी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button