“संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील” डॉ पी. पी. माहुलीकर.अमळनेर : “पीएच.डी करताना होणारे संशोधन दर्जेदार व्हावे या दृष्टीने विद्यापीठाने संशोधन प्रक्रियेत अनेक बदल केले असून संपूर्ण प्रक्रिया तंत्रस्नेही व संशोधन पूरक करण्याचा प्रयत्न विद्यापीठाने केलेला आहे ही प्रक्रिया समजून घेऊन संशोधक मार्गदर्शक व विद्यार्थी यांनी आपल्या संशोधनाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करावा” असे आव्हान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ पी. पी. माहुलीकर यांनी केले.धनदाई महाविद्यालय अमळनेर व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानव्यविद्या शाखेतील संशोधक मार्गदर्शक व विद्यार्थी यांच्या एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
अमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्रात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून डॉ. माहुलीकर तर प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए. बी. चौधरी, ज्येष्ठ मार्गदर्शक तथा समाज विज्ञान शाखेचे माजी अधिष्ठाता डॉ पी. डी. देवरे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्र.अधिष्ठाता डॉ. छाजेड, मानव विद्याशाखेचे प्र.अधिष्ठाता डॉ प्रमोद पवार,महाविद्यालयाचे चेअरमन व.ता. पाटील, विद्यापीठ अधिसभा सदस्य दिनेश नाईक हे तर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून तत्त्वज्ञान केंद्राचे मानद संचालक डॉ एस. आर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.मानव्यविद्या शाखेतील संशोधक हे मानवी स्वभावाचा अभ्यास करतात, तो संदर्भानुसार सतत बदलत राहतो यामुळे विद्यार्थ्यांनी संशोधन पद्धतीची काळजीपूर्वक निवड करावी व काळानुसार अपडेट व्हावे असे आव्हान मानव्यविद्या शाखेचे शाखेचे प्र.अधिष्ठाता प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनी प्रास्ताविकात केले.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए. बी.चौधरी यांनी संशोधनातील प्रामाणिकपणा व ते करताना पाळायची नैतिकता याविषयी विस्तृत मार्गदर्शन करून आपले रिसर्च पेपर हे यूजीसीने निर्देशित केलेल्या केअर लिस्ट मध्ये प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे सांगितले.या नंतरच्या सत्रात डॉ. पी. डी. देवरे यांनी सामाजिक शास्त्रांमध्ये चालणारे संशोधन व त्याचा तात्विक आधार उपस्थितांना स्पष्ट करून सांगितला.कार्यशाळेच्या तृतीय सत्रात विद्यापीठातील डॉ. समीर नारखेडे यांनी पीएच.डी. नोंदणी पासून ते आपला शोधप्रबंध सादर होईपर्यंतची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने कशी करावी हे प्रात्यक्षिकासह स्पष्ट केले. तत्वज्ञान केंद्राचे मानद संचालक डॉ. एस. आर. चौधरी यांनी प्रदीर्घ इतिहास असलेल्या या तत्त्वज्ञान मंदिरात अशा प्रकारचा उपक्रम होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला व उपस्थितांना मार्गदर्शन केले.भोजनानंतर च्या सत्रात प्र-कुलगुरू डॉ. माहुलीकर यांनी पीएच.डी. प्रक्रियेचे स्वरूप, बदललेली नियमावलीव त्यानुसार करावयाचे संशोधन स्पष्ट करून ही संपूर्ण प्रक्रिया संशोधन पूरक व दर्जा उंचावणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतरच्या अत्यंत महत्त्वपूर्ण सत्रात विद्यापीठाच्या ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. अनिल चिकाटे यांनीसंशोधन क्षेत्रात वांगमय चौर्य करणे हा अपराध असल्याचे स्पष्ट करत त्यासाठी विद्यापीठ वापरीत असलेल्या उरकुंड या सॉफ्टवेअरची माहिती देऊन आपल्या संशोधनात वांग्मय चौर्य होणार नाही याची काळजी घ्यावी असे आव्हान केले. कार्यशाळेच्या अखेरच्या सत्रात विद्यापीठातील मराठी विभागाचे डॉ. आशुतोष पाटील यांनी भाषा क्षेत्रात होणाऱ्या संशोधनासाठी संशोधन पद्धती ही अत्यंत वेगळी असून संशोधकांनी ढोबळ संशोधन करण्याचा मोह टाळून सूत्रबद्ध संशोधन हाती घ्यावे असा सल्ला उपस्थितांना दिला.समारोपीय सत्रात उपस्थितांपैकी डॉ.वकार शेख यांनी मनोगत व्यक्त केले.सदर कार्यशाळेत विद्यापीठ क्षेत्रातील सुमारे दोनशे संशोधन मार्गदर्शक व विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लीलाधर पाटील यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रताप तत्वज्ञान केंद्राचे संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.






