काळाच्या पडद्याआड गेलेला टांगा ठरतोय अमळनेरकरांना आकर्षण गोपाळ काका जपताहेत वारसा..
प्रा जयश्री दाभाडे
सध्या अमळनेर शहरात गोपाळ दिक्षित हे अत्यंत सुंदर टांगा घेऊन लहान मुलांना फिरवून आणतात. ते रोज सायंकाळी ग्लोबल शाळे जवळून जातात आणि शिवाजी बागे जवळ देखील सायंकाळी असतात.नवीन पिढीला टांगा हा प्रकार काही माहीत नाही परंतु गोपाळ जोशी मात्र उतार वयात ही जुन्या आठवणी ताज्या ठेवून ही आवड जपत आहेत.यामागे त्यांचा पैसे कमविणे हा उद्देश नाही त्यांची मुले मोठी आहेत आणि व्यवस्थित कमवीत आहेत.एकेकाळी गोपाळ दिक्षित टांग्यावरच आपला उदरनिर्वाह करत असत.आज मात्र वयोवृद्ध गोपाळ काका टांगे वाले काका म्हणून प्रसिद्ध झाले आहेत.नम्र, गोड स्वभाव आणि काम करत राहण्याची जिद्द यामुळे गोपाळ काका आजही सकाळ संध्याकाळ टांगा घेऊन बाहेर पडतात.अमळनेर करांना सुखद अनुभव देतात.आणि तरुण पिढीला शिकवण ही देतात की कितीही वय झालं तरी कर्म करत राहिले पाहिजे.टांग्याची ओळख नवीन पिढीला करून देतात आणि जुना सांस्कृतिक वारसा जपतात.

अमळनेर येथे एकेकाळी टांग्याची सवारी खूपच महत्वपूर्ण होती.सायकल आणि टांगा या दोन सवारी म्हणजे सामान्य माणसाच्या आयुष्यात अविभाज्य घटक होते. एकदम पैसे वाले किंवा श्रीमंत असलेल्या लोकांकडे दोन चाकी गाडी असे.चारचाकी गाडी तर फक्त एक दोन लोकां कडेच पहावयास मिळत असे.
मला चांगलं आठवतं पाच नं शाळेच्या समोरील सर्व घरे टांगा चालविणाऱ्यांचे होते.टांगा चालवून उदरनिर्वाह करणारी ही मंडळी खूप प्रेमळ आणि नम्र होती.स्टेशन,बस स्थानक बाजारपेठ सिनेमा गृह इ ठिकाणा हुन अधिक टांग्याच्या फेऱ्या होत असत.यात्रे च्या वेळी टांग्यातून यात्रे त जाणे म्हणजे लहान मुलांना पर्वणी असे.हे सर्व टांगे अत्यंत सुंदर आकर्षक आणि सजविलेले असत घोड्यांच्या गळ्यात घुंगरू,पायात चाळ,सुंदर आकर्षक सीट,टांग्याच्या चाकांना केलेली सजावट,एका लयीत येणारा घोड्याच्या टापांचा आवाज आणि शोले पिक्चर मधील चल मेरी धन्नो हे वाक्य आजही कायम लक्षात आहे. आजच्या नवीन पिढीला या गोष्टी आश्चर्यकारक वाटतात पण त्या खरंच किती आनंददायी होत्या हे ज्यांनी हे अनुभव घेतले आहेत तेच सांगू शकतील.






